India vs South Africa 2nd Test Match, WTC Points Table: भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने दोन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. दुसरा सामना जिंकल्यानंतर भारताला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये मोठा फायदा झाला आहे. या सामन्यापूर्वी गुणतालिकेमध्ये सहाव्या स्थानावर असलेल्या टीम इंडियाने मोठी झेप घेतली आणि थेट अव्वल स्थानी पोहोचले आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेला मोठा फटका बसला असून त्यांनी गुणतालिकेतील अव्वल स्थान गमावले आहे. भारताकडे आता ५४.१६ टक्के गुण आहेत, तर दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशकडे ५० टक्के गुण आहेत. जाणून घ्या सर्व संघांची स्थिती काय आहे?
भारताने आतापर्यंत चार कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी दोन जिंकले आणि एक हरला, तर एक सामना अनिर्णित राहिला. भारत २६ गुणांसह अव्वल आहे आणि एकूण गुणांची टक्केवारी ५४ टक्के आहे. भारताला आता इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. जर यातील चार सामने भारताने जिंकले तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिप फायनलमध्ये स्थान जवळपास निश्चित होण्यास मदत होईल.
भारताने मालिका १–१ अशी बरोबरीत सोडवली
केप टाऊन कसोटी जिंकून भारताने इतिहास रचला. त्याने येथे प्रथमच कसोटी सामना जिंकला आहे. केप टाऊनमध्ये भारताचा हा सातवा कसोटी सामना होता. यापूर्वी सहापैकी चारमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. दोन कसोटी सामने अनिर्णित राहिले. भारताने केप टाऊन कसोटी जिंकून मालिकेतही १-१ अशी बरोबरी साधली. दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका ड्रॉ करण्यात भारताला यश मिळण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २०१०-११मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली तीन कसोटी सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत संपली होती.
दुसऱ्या डावात रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी केली. यशस्वीच्या रूपाने भारताला पहिला धक्का बसला. २३ चेंडूत २८ धावा करून तो बाद झाला. त्याने सहा चौकार मारले. आंद्रे बर्गरच्या चेंडूवर तो ट्रिस्टन स्टब्सकरवी झेलबाद झाला. भारताला दुसरा धक्का शुबमन गिलच्या रूपाने बसला. तो ११ चेंडूत १० धावा करून बाद झाला. कागिसो रबाडाने त्याला क्लीन बोल्ड केले. शुबमनने आपल्या खेळीत दोन चौकार मारले. विराट कोहली बाद होणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला. तो ११ चेंडूत १२ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मार्को यान्सनच्या चेंडूवर यष्टिरक्षक काइल वेरेयनने झेल घेतला. रोहित शर्मा (१७ धावा) आणि श्रेयस अय्यर (४ धावा) यांनी सामना संपवला.