India vs South Africa, T20 Series: भारतीय संघ बुधवारी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना झाला आहे. येथे, सर्व प्रथम सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघ १० डिसेंबरपासून तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना डर्बनमध्ये होणार आहे. या मालिकेतील पाच युवा खेळाडूंवर बीसीसीआयची करडी नजर असणार आहे.
भारताचा टी-२० संघ तरुण खेळाडूंनी भरलेला आहे, ज्यांना भारतात ऑस्ट्रेलिया विरुद्ध नुकत्याच झालेल्या टी-२० मालिकेत आपल्या कामगिरीने सर्वांकडून कौतुकाची थाप मिळाली होती. पण या युवा खेळाडूंची खरी परीक्षा दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांवर होणार आहे. येथील वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर सूर्यकुमार यादवच्या युवा ब्रिगेडमधील खेळाडूंसह चाहत्यांची आणि बीसीसीआयची देखील लक्ष्य ठेवून असणार आहे.
१– रिंकू सिंग
भारतीय संघाला रिंकू सिंगच्या रूपाने एक अप्रतिम फिनिशर मिळाला आहे. युवा आणि आक्रमक फलंदाजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत स्वत:ला चांगले सिद्ध केले. या मालिकेत २६ वर्षीय फलंदाजाने खेळलेल्या ४ डावांमध्ये रिंकूचा स्ट्राइक रेट १७५ होता. यादरम्यान, दुसऱ्या टी-२० सामन्यात त्याने केवळ ९ चेंडूत ३४४.४४ च्या स्ट्राइक रेटने ३७ धावा केल्या होत्या. त्याचवेळी चौथ्या सामन्यात त्याने २९ चेंडूत ४६ धावा केल्या. रिंकू सिंग षटकार मारण्यातही माहिर आहे. रायपूरमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातही रिंकूने बेन द्वारशुईसच्या चेंडूवर पूर्ण १०० मीटरचा षटकार मारला होता.
२- रवी बिश्नोई
फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईने आपल्या अलीकडच्या काळात त्याच्या शानदार कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. २३ वर्षीय गोलंदाजाने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेत भारतीय संघासाठी अप्रतिम गोलंदाजी केली. रायपूरमधील चौथ्या टी-२० सामन्यात बिश्नोईने ४ षटकांच्या स्पेलमध्ये केवळ १७ धावा दिल्या, तसेच एक विकेटही घेतली. मालिकेतील ५ सामन्यांमध्ये त्याने ८.२०च्या इकॉनॉमी रेटने सर्वाधिक ९ विकेट्स घेतल्या. यासाठी त्याला मालिकावीराचा पुरस्कार देखील देण्यात आला. दक्षिण आफ्रिका मालिकेसाठीही बिश्नोईची निवड झाली आहे. अशा परिस्थितीत २३ वर्षीय गोलंदाजासाठी स्वत:ला सिद्ध करण्याची ही सुवर्णसंधी असू शकते.
३– ऋतुराज गायकवाड
ऋतुराज गायकवाडने मागील सामन्यांमध्ये सलामीवीर म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे. या फलंदाजाने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये अप्रतिम खेळी केली आहे. त्याने भारतीय भूमीवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक २२३ धावा केल्या. या दरम्यान या सीएसकेच्या खेळाडूने १२३ धावांची दमदार नाबाद खेळी खेळली आणि आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले.
ऋतुराजने भारतीय संघासाठी एकूण १९ टी-२० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ५०० धावा पूर्ण केल्या आहेत. यापूर्वी आशियाई क्रीडा स्पर्धेतही त्याच्याकडे भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. त्याच्या व्यतिरिक्त, भारतीय टी-२० संघात यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल यांचाही समावेश आहे, ज्यांनी सलामीवीर म्हणून आपला दावा सिद्ध केला आहे. अशा स्थितीत गायकवाडला किती संधी मिळतात, हे पाहावे लागेल.
४– जितेश शर्मा
या यष्टीरक्षक फलंदाजाने भारतीय संघासाठी आतापर्यंत केवळ ५ टी-२० सामने खेळले आहेत, ज्यात त्याने ३ डावात ६४ धावा केल्या आहेत. पण त्याच्या अलीकडच्या कामगिरीबद्दल बोलताना शर्माला ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन संधी देण्यात आल्या होत्या. या दोन्ही डावात जितेशने संघाला सध्या आवश्यक असलेला स्ट्राईक रेट दिला आहे. जितेशने ऑस्ट्रेलिया मालिकेतील चौथ्या टी-२० मध्ये १९ चेंडूत ३५ धावा करत मोलाची भूमिका निभावली होती. पाचव्या टी-२० मध्ये १६ चेंडूत २४ धावा केल्या होत्या. आगामी दक्षिण आफ्रिका मालिकेत इशान किशनचाही समावेश आहे. अशा स्थितीत जितेश आणि इशानला भारतीय संघ किती संधी देतो, हे पाहावे लागेल.
५– यशस्वी जैस्वाल
यशस्वी जैस्वालसाठी आगामी दक्षिण आफ्रिकेची मालिका खूप महत्त्वाची असणार आहे. जैस्वालने १२ टी-२० डावात एकूण ३७० धावा केल्या आहेत. मात्र, या काळात त्याने एक शतक आणि दोन अर्धशतकेही झळकावली आहेत. अलीकडच्या सामन्यांमध्ये खराब शॉट्स खेळून यशस्वी बाद होताना दिसला. जैस्वालने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही भारतीय संघाला वेगवान सुरुवात करून दिली पण, काही सामन्यांमध्ये तीच लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करताना काही चुकीचे फटके खेळून तो बाद झाला.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ
यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा. कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चाहर.