India vs South Africa 2nd Test Match: सोमवारी (८ जानेवारी) दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात झालेल्या कमी धावसंख्येच्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मालिकेच्या सामन्यानंतर आयसीसीने न्यूलँड्सच्या खेळपट्टीला चांगले रेटिंग दिले नाहीत. भारताने दोन दिवसांतच दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत एक इतिहास रचला. नुकताच झालेल्या कसोटी सामन्यातील या खेळपट्टीवर आयसीसीने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केप टाऊनमधील न्यूलँड्समध्ये फक्त ६४२ चेंडूंचा कसोटी सामना खेळला गेला. मोहम्मद सिराजने पहिल्या डावात १५ धावांत ६ विकेट्स घेतल्याने दक्षिण आफ्रिकेचा डाव ५५ धावांत आटोपला.
आयसीसी सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी आपला अहवाल आयसीसीच्या मुख्य अधिकारी यांना सादर केला. त्या अहवालात सामना अधिकार्यांनी खेळपट्टीवर चिंता व्यक्त केली गेली आणि मूल्यांकनानंतर, केप टाऊनमधील न्यूलँड्सची खेळपट्टी दर्जेदार नसल्याचे मानले गेले. ब्रॉड म्हणाले, “न्यूलँड्सच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे खूप कठीण होते. संपूर्ण सामन्यात चेंडू पटकन बॅटवर येत होता तर कधी धोकादायकपणे बाऊन्स झाला, ज्यामुळे शॉट्स खेळणे कठीण झाले. चेंडू अनेक फलंदाजांच्या ग्लोव्हजला लागला आणि विचित्र उसळीमुळे अनेक खेळाडू दुखापतग्रस्त देखील झाले. कसोटीच्या पहिल्या दिवशी २५ विकेट्स पडल्या, यातून खेळपट्टीचा नेमका अंदाज येतो.”
हेही वाचा: Team India: BCCIला मिळाले नवीन प्रायोजक, होम सीझनसाठी केला मोठा करार; कोण आहेत ते? जाणून घ्या
जागतिक कसोटी चॅम्पियन्सशीपमध्ये भारतीय संघ अव्वल स्थानी
भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने दोन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. दुसरा सामना जिंकल्यानंतर भारताला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये मोठा फायदा झाला आहे. या सामन्यापूर्वी गुणतालिकेमध्ये सहाव्या स्थानावर असलेल्या टीम इंडियाने मोठी झेप घेतली आणि थेट अव्वल स्थानी पोहोचले आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेला मोठा फटका बसला असून त्यांनी गुणतालिकेतील अव्वल स्थान गमावले आहे. भारताकडे आता ५४.१६ टक्के गुण आहेत, तर दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशकडे ५० टक्के गुण आहेत. जाणून घ्या सर्व संघांची स्थिती काय आहे?
भारताने आतापर्यंत चार कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी दोन जिंकले आणि एक हरला, तर एक सामना अनिर्णित राहिला. भारत २६ गुणांसह अव्वल आहे आणि एकूण गुणांची टक्केवारी ५४ टक्के आहे. भारताला आता इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. जर यातील चार सामने भारताने जिंकले तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिप फायनलमध्ये स्थान जवळपास निश्चित होण्यास मदत होईल.
भारताने मालिका १–१ अशी बरोबरीत सोडवली
केप टाऊन कसोटी जिंकून भारताने इतिहास रचला. त्याने येथे प्रथमच कसोटी सामना जिंकला आहे. केप टाऊनमध्ये भारताचा हा सातवा कसोटी सामना होता. यापूर्वी सहापैकी चारमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. दोन कसोटी सामने अनिर्णित राहिले. भारताने केप टाऊन कसोटी जिंकून मालिकेतही १-१ अशी बरोबरी साधली. दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका ड्रॉ करण्यात भारताला यश मिळण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २०१०-११मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली तीन कसोटी सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत संपली होती.