India vs South Africa 1st Test Match: सेंच्युरियनमध्ये खेळल्या जात असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाची गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही बाबतीत आतापर्यंत निराशा झाली आहे. मात्र, आता या सगळ्या दरम्यान दिनेश कार्तिकने भारतीय संघातून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीचे महत्त्व स्पष्ट केले आहे. पहिल्या कसोटीतील टीम इंडियाच्या आतापर्यंतच्या कामगिरीबाबत दिनेश कार्तिक म्हणाला की, “शमी संघात असणे गरजेचे होते.”
२०२३च्या विश्वचषक स्पर्धेत शानदार गोलंदाजी करणारा मोहम्मद शमी घोट्याच्या दुखापतीमुळे आफ्रिका दौऱ्यावर गेला नव्हता. पहिली कसोटी जसजशी पुढे सरकत गेली तसतशी भारताला त्याची उणीव जाणवू लागली. सलामी गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी काही विकेट्स घेण्यात यश मिळवले, तर गोलंदाजीत बदल म्हणून समाविष्ट करण्यात आलेले शार्दुल ठाकूर आणि प्रसिध कृष्णाला फारसा प्रभाव पाडता आला नाही.
दिनेश कार्तिक म्हणाला, “मोहम्मद शमीमध्ये सेंच्युरियनसारख्या खेळपट्टीवर सरळ सीम राखण्याची क्षमता आहे, ज्यामुळे तो विकेट्स मिळवू शकतो. आताच्या घडीला भारताकडे शमी सारखा गोलंदाज असणे खूप महत्वाचे होते.” तो म्हणाला, “मी तुम्हाला वचन देतो की जर तो तिथे असता तर भारताला येथे अनेक विकेट्स मिळाल्या असत्या. भारतीय संघाला त्याची खूप उणीव भासत आहे.”
आशिया कपपासून के.एल. राहुलमध्ये सातत्याने सुधारणा होत आहे – दिनेश कार्तिक
लोकेश राहुलनेही फटके खेळले आणि जेव्हा गरज पडली तेव्हा बचावही केला. कार्तिकच्या मते, के.एल. राहुल नेहमी परदेशात धावा करतो. क्रिकबझवरील संभाषणात तो म्हणाला, “के.एल. राहुल जेव्हा सुरुवातीला फलंदाजीला आला तेव्हा त्याने टॉप ऑर्डरच्या फलंदाजांबरोबर चांगली भागीदारी केली. परदेशात नेहमी धावा करणारा तो फलंदाज, ही त्याची खासियत असून फार कमी फलंदाजांमध्ये पाहायला ती मिळते. के.एल. राहुल सतत संपूर्ण जगाला दाखवत आहे की त्याला इतके उच्च रेटिंग का दिले जाते. त्याने इंग्लंडमध्ये काही शतके झळकावली आहेत, ऑस्ट्रेलियात धावा केल्या आहेत आणि याआधी याच मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक ठोकले होते. जेव्हा तो क्रिझवर आला तेव्हा या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे नव्हते. सुरुवातीला तो खूप संयमाने खेळला पण जेव्हा तळाचे फलंदाज आले तेव्हा त्याने फटकेही मारले. जेव्हापासून आशिया कपमधून तो भारतीय संघात परतला तेव्हापासून त्याने मागे वळून पाहिलेच नाही.”
भारताची खराब गोलंदाजी
भारताकडून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत २-२ विकेट्स घेतल्या आहेत. तर प्रसिध कृष्णाच्या खात्यात एक विकेट आहे. कृष्णा आणि सिराजने नक्कीच विकेट घेतल्या पण गोलंदाजीत ते थोडे महागडे ठरले. शार्दुल ठाकूरही महागात पडला आहे. त्याने आतापर्यंत १२ षटकात ५७ धावा दिल्या आहेत. तर सिराजने १५ षटकात ६३ धावा दिल्या.