दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियन मैदानावर भारतानं तब्बल ११३ धावांनी विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सेंच्युरियनवर मिळवलेल्या विजयामुळे भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये १-० ने आघाडी घेतली आहे. भारतानं पहिल्यांदाच सेंच्युरियनवर दक्षिण आफ्रिकेच्या संघाला टेस्ट क्रिकेटमध्ये मात दिल्यामुळे हा विजय भारतासाठी ऐतिसासिक ठरला आहे. पण यासोबतच, या एकाच सामन्यात भारतानं विजय मिळवल्यामुळे इतरही काही विक्रम भारतानं आपल्या नावावर केले आहेत. त्यामुळे सेंच्युरियन मैदानावरचा विजय भारतासाठी खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरला आहे.

सेंच्युरियनवरचा पहिला विजय

सेंच्युरियन मैदानावर टीम इंडियानं पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेला कसोटी सामन्या हरवलं आहे. त्यामुळे या विजयानं टीम इंडियाच्या शिरपेचात मानाचा तुराच खोवला गेला आहे. कारण सेंच्युरियनवर दक्षिण आफ्रिकेचा संघ कायमच कसोटी सामन्यांमध्ये विरोधी संघावर वरचढ ठरला आहे. या विजयामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियासाठी वर्षाचा शेवट गोड झाला आहे.

सेंच्युरियनवर दक्षिण आफ्रिकेला हरवणारा तिसराच संघ

सेंच्युरियनच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पराभूत करणारा भारत हा तिसराच देश ठरला आहे. याआधी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या क्रिकेट टीमने दक्षिण आफ्रिकेला कसोटी सामन्यात सेंच्युरियन मैदानावर पराभूत केलं होतं.

७ वर्षांनंतर द. आफ्रिका सेंच्युरियनवर पराभूत

तब्बल ७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेनं सेंच्युरियनवर कसोटी सामन्यात पराभवाचा सामना केला आहे. याआधी २०१४मध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघानं दक्षिण आफ्रिकेला सेंच्युरियनच्या मैदानावर पराभूत केलं होतं.

भारतासाठी चौथा कसोटी विजय

दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतानं मिळवलेला हा फक्त चौथा कसोटी विजय ठरला आहे. त्यामुळे या विजयामुळे टीम इंडियाच्या नावे हा विक्रम नोंदवला गेला असून कॅप्टन विराट कोहलीसाठी देखील त्याच्या नेतृत्वाखाली मिळवलेला हा विजय संस्मरणीय ठरला आहे.

फक्त दुसऱ्यांदा घेतली मालिकेत आघाडी

चौथ्या विजयाप्रमाणेच टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतानं फक्त दुसऱ्यांदा कसोटी मालिकेमध्ये आघाडी घेतली आहे. याआधी २००६ मध्ये भारतानं पहिला सामना जिंकत मालिकेमध्ये आघाडी घेतली होती. मात्र, ती मालिका भारतानं गमावली होती. त्यानंतर आता दुसऱ्यांदा भारतानं दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत आघाडी घेतली आहे.

४० पैकी ३८ विकेट्स फास्ट बॉलर्सच्या नावे!

आज संपलेल्या कसोटी सामन्यामध्ये एकूण ४० विकेट्स पडल्या. यामध्ये दोन्ही संघाचे सर्व फलंदाज दोन्ही डावांमध्ये बाद झाले. पण विशेष म्हणजे, या ४० पैकी ३८ विकेट्स या फास्ट बॉलर्सनी घेतल्या आहेत. शेवटच्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या डावातल्या शेवटच्या दोन फलंदाजांना भारताच्या रविचंद्रन अश्विननं सलग दोन चेंडूंवर बाद केलं.