भारताविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने (CSA) २१ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. २६ डिसेंबर ते १५ जानेवारी २०२२ या कालावधीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाविरुद्ध तीन कसोटी सामन्यांमध्ये खेळेल. बायो बबलमुळे एवढ्या मोठ्या संख्येने खेळाडूंचा बोर्डाकडून संघात समावेश करण्यात आला आहे. ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC) भाग आहे. या मालिकेतील सामने सेंच्युरियन, वाँडरर्स आणि न्यूलँड्स येथे खेळवले जातील. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेत कधीही कसोटी मालिका जिंकलेली नाही.
दक्षिण आफ्रिकेची राष्ट्रीय निवड समिती त्याच कोअर ग्रुपसोबत गेली आहे, जिने या वर्षी जूनमध्ये वेस्ट इंडिजचा यशस्वी दौरा केला होता. कगिसो रबाडा, क्विंटन डी कॉक आणि एनरिक नॉर्किया या मालिकेत पुनरागमन करत आहेत. सीमर डुआन ऑलिव्हियर हा देखील संघाचा एक भाग आहे, जो यूकेमध्ये दीर्घकाळ राहिल्यानंतर दक्षिण आफ्रिकेत परतला आहे.
हेही वाचा – VIDEO : तेरी मेरी यारी..! टीम इंडियाच्या माही-युवीचं REUNION; फोटोही झाले वाऱ्यासारखे व्हायरल!
ऑलिव्हियरची दक्षिण आफ्रिकेसाठीची शेवटची कसोटी फेब्रुवारी २०१९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळली गेली होती. २९ वर्षीय ऑलिव्हियरने सीएसए चार दिवसीय मालिकेत जोरदार पुनरागमन केले आहे. ऑलिव्हियरने ८ डावात ११.१४च्या सरासरीने २८ विकेट घेतल्या. ५३ धावांत ५ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. यामुळे त्याला संघात स्थान मिळाले आहे. सिसांडा मगाला आणि रायन रिकेल्टन यांना प्रथमच कसोटी संघात स्थान मिळाले आहे. पहिली कसोटी २६ डिसेंबरपासून, दुसरी कसोटी ३ जानेवारीपासून आणि शेवटची कसोटी ११ जानेवारीपासून होणार आहे.
भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा कसोटी संघ:
डीन एल्गर (कर्णधार), टेंबा बावुमा (उपकर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), कगिसो रबाडा, सारेल एरवी, ब्यूरन हेंड्रिक्स, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, लुंगी एनगिडी, एडन मार्कराम, वियान मुल्डर, एनरिक नॉर्किया, कीगन पीटरसन, रॅसी व्हॅन डर ड्यूसेन, काइल व्हर्न, मार्को जानसेन, ग्लेंटन स्टुर्मन, प्रिनेलेन सुब्रायन, सिसांडा मॅगाला, रायन रिकेल्टन आणि डुआन ऑलिव्हियर.