India vs South Africa T20 Playing 11 Prediction: भारताने गेल्या पाच वर्षांत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिका गमावलेली नाही. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला, आता फक्त दोन सामने बाकी आहेत. भारतासमोर केवळ मालिका जिंकण्याचेच आव्हान नाही, तर पुढील वर्षी वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वीचे पाचही टी-२० सामने जिंकायचे आहेत. या पाच टी-२० सामन्यांच्या आधारे भारताला विश्वचषकासाठी आपला संघ निवडायचा आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवडकर्त्यांनी अनेक नव्या क्रिकेटपटूंना संधी दिली आहे, मात्र पहिला सामना पावसामुळे न होऊ शकल्याने १७ सदस्यीय संघातील प्रत्येकाला आजमावण्याची संधी मिळणार नाही, हे निश्चित झाले आहे. २०१८ मध्ये भारताने आफ्रिकेविरुद्ध शेवटची टी-२० मालिका खेळली होती. तीन सामन्यांच्या या मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळवला.
पोर्ट एलिझाबेथमध्ये येथेही पावसाची शक्यता आहे
डरबनमध्ये पावसामुळे कर्णधार सूर्यकुमार यादव आणि एडन मार्कराम हे दोघेही नाणेफेकसाठी बाहेर पडू शकले नाहीत. पूर्वी पोर्ट एलिझाबेथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गेबरहा येथील सेंट जॉर्जेस पार्कमध्येही हवामानाची परिस्थिती चांगली नाही. येथेही मंगळवारी पावसाची शक्यता आहे. या दोन टी-२० सामन्यांनंतर भारताला पुढील महिन्यात अफगाणिस्तानविरुद्ध तीन टी-२० सामने खेळायचे आहेत. यानंतर आयपीएल होणार आहे. कर्णधार सूर्यकुमारने असेही म्हटले आहे की, “फारसे आंतरराष्ट्रीय टी-२० सामने नसल्यामुळे विश्वचषक संघाच्या निवडीसाठी आयपीएल हा प्रमुख आधार असायला हवा.”
दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेवर अनेक प्रश्नचिन्ह
आतापर्यंतच्या कामगिरीच्या आधारे सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंग हे सहा महिन्यांनी होणाऱ्या विश्वचषकासाठीचे निश्चित दावेदार मानले जाऊ शकतात. शुबमन गिल विश्वचषकापासून खेळलेला नाही. यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध धावा केल्या आहेत, परंतु रोहित शर्मा आणि विराट कोहली टी-२० विश्वचषकासाठी उपलब्ध असल्याने, या दोन फलंदाजांना आयपीएलमध्ये आपला दावा सांगण्यासाठी अविश्वसनीय कामगिरी करावी लागेल. मात्र, विश्वचषकापूर्वी भारतीय संघाच्या टी-२० वेळापत्रकावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रिंकूप्रमाणेच जितेश शर्माकडेही फिनिशर म्हणून पाहिले जात आहे, पण त्याची उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी त्याला सामन्यांची गरज आहे. त्याला पुढील दोन सामन्यांमध्ये संधी मिळेल, अशी आशा आहे.
युवा फलंदाजांची कसोटी लागणार आहे
दक्षिण आफ्रिकन खेळपट्ट्यांवर अतिरिक्त बाऊन्स जेथे भारताच्या युवा फलंदाजांची कसोटी लागणार आहे. शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वाल यांच्यामध्ये भारतीय संघ व्यवस्थापन कोणाला सलामीसाठी पाठवते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. रिंकू सिंह आणि यशस्वी सलामी देत राहण्याची शक्यता अधिक आहे, तर शुबमनला विराट कोहलीची जबाबदारी अर्थात तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळेल. मात्र, तिघेही खेळले तर मधल्या फळीतील कुणाला तरी बाहेर बसावे लागेल. श्रेयस अय्यर, रिंकू आणि कर्णधार सूर्या खेळणार हे निश्चित. जितेश कुमार यष्टिरक्षकाची जबाबदारी सांभाळताना दिसतो.
अशा परिस्थितीत रिंकू सिंह, यशस्वी आणि शुबमन या तिघांनाही एकत्र खेळणं जवळपास अशक्य आहे. शुबमन किंवा ऋतुराज या दोघांपैकी एकाला खेळण्याची संधी मिळू शकते, जे यशस्वीबरोबर सलामी देऊ शकतात. यशस्वीमध्ये सुरुवातीलाच आक्रमक फलंदाजी करण्याची क्षमता आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग हे विश्वचषक संघात निवडले जाण्याचे मोठे दावेदार आहेत. बुमराह वर्ल्ड कपपासून खेळत नाहीये. दीपक चाहर सध्या आपल्या आजारी वडिलांची काळजी घेण्यासाठी भारतात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कुलदीप यादव आणि रवी बिश्नोई यांनी छाप पाडली. आता या मालिकेत रवींद्र जडेजाही त्याच्याबरोबर आला आहे.
दक्षिण आफ्रिकेकडेही कमी सामन्यांचा पर्याय आहे
केवळ भारतच नाही तर यजमान देश आफ्रिकेसाठीही ही मालिका खूप महत्त्वाची आहे. भारतासारखेच आफ्रिकेलाही विश्वचषकापूर्वी केवळ पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत. विश्वचषक संघ निवडण्यासाठी त्यांच्याकडे सामन्यांसाठी कमी पर्याय आहेत. पहिल्या दोन सामन्यांसाठी मार्को जॅन्सन आणि गेराल्ड कोएत्झी यांचा संघात समावेश करण्यात आला होता. आता हे दोघेही मंगळवारच्या सामन्यासाठीच उपलब्ध असतील. दक्षिण आफ्रिकेला या मालिकेसाठी ओटनील बार्टमन, मॅथ्यू ब्रिट्झके, नांद्रे बर्जर यांसारखे क्रिकेटपटू आजमावे लागणार आहेत.
दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-११
भारत: यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल/ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, मुकेश कुमार, कुलदीप यादव/रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
दक्षिण आफ्रिका: रीझा हेंड्रिक्स, २ मॅथ्यू ब्रिट्झके, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स/हेन्रिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, मार्को जॅन्सेन/अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, गेराल्ड कोएत्झी, नांद्रे बर्गर, तबरेझ शामसी.