Ravi Shastri on Virat Kohli: क्रिकेटचा बादशहा म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली विश्वचषकानंतर प्रथमच क्रिकेटच्या मैदानात परतण्यासाठी सज्ज झाला असून, तो कसोटी क्रिकेटमधून पुनरागमन करत आहे. विश्वचषकानंतर कोहलीने मर्यादित षटकांच्या मालिकेतून ब्रेक घेतला. कोहली सध्या सेंच्युरियन, दक्षिण आफ्रिकेत असून २६ तारखेपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी तयारी करत आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कसोटी क्रिकेट जिवंत ठेवल्याबद्दल विराट कोहलीचे कौतुक केले.
शास्त्री सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिकेत पॅनेल सदस्य म्हणून सहभागी आहेत. फॉक्स स्पोर्ट्सशी बोलताना शास्त्री म्हणाले की, “विराट कोहलीने कसोटी क्रिकेट खेळणे चालूच ठेवले आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रात विराट कोहलीसारखे कसोटी क्रिकेटचे अॅम्बेसेडर फार कमी आहेत. विराटसारख्या खेळाडूंमुळेच कसोटी क्रिकेट अजूनही जिवंत आहे.”
विराट कोहली कसोटी क्रिकेटची पूजा करतो– शास्त्री
“रवी शास्त्री जेव्हा टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक होते, तेव्हा विराट कोहली तिन्ही फॉरमॅटमध्ये संघाचा कर्णधार होता. या दोघांच्या जोडीगोळीने टीम इंडियासाठी चांगले काम केले आहे. या काळात भारतीय क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटमध्ये मोठी उंची गाठली. त्याचेच परिणाम आता दिसत आहेत. बीसीसीआयने देखील यात खूप पुढाकार घेतला,” असे मत वसीम अक्रम याने व्यक्त केले.
रवी शास्त्री यांनी याआधी कोहली आणि कसोटी क्रिकेटबद्दल सांगितले होते की, “विराट कसोटी सामन्याच्या क्रिकेटची पूजा करतो, जसे की बहुतेक संघ करतात. जे जगाला आश्चर्यचकित करू शकते कारण, टीम इंडिया एकदिवसीय क्रिकेट आणि नंतर इंडियन प्रीमियर लीगइतकेच खेळते. तुम्ही संघातील कोणालाही विचाराल तर त्यापैकी ९९ टक्के लोक म्हणतील की त्यांना कसोटी क्रिकेट आवडते. तर, गेल्या पाच वर्षांत भारताने काय केले? प्रत्येक वर्षाच्या शेवटी जगातील नंबर १ संघ होण्यासाठी टीम इंडिया कसोशीने प्रयत्न करते.”
विराट कोहलीबरोबरच रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह हे देखील कसोटी मालिकेद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेत इतिहास रचायचा आहे. आजपर्यंत भारताला दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. यावेळी त्यांना हा इतिहास रचण्याची संधी निर्माण झाली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. हा सामना सेंच्युरियनमध्ये होणार आहे. दुसरी आणि अंतिम कसोटी ३ जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळवली जाणार आहे.
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत खेळणार नाही. कौटुंबिक कारणामुळे त्याने रजा मागितली आहे. बीसीसीआयने त्यांची ही विनंती मान्य केली. इशानला दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघातून मुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या जागी के.एस. भरत यांचा समावेश करण्यात आला आहे.
भारताचा कसोटी संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिध कृष्णा, के.एस. भरत (यष्टीरक्षक).