भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊनमध्ये तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. जो संघ हा सामना जिंकेल, मालिका त्याच संघाची असेल. अशा स्थितीत दोन्ही संघ विजयासाठी पूर्ण जोर लावत आहेत. या कसोटीचा पहिला दिवस दक्षिण आफ्रिकेच्या नावावर होता, तर दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने शानदार पुनरागमन केले. भारताने पहिल्या डावात २२३ धावांच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला २१० धावांत गुंडाळले. जसप्रीत बुमराह भारतासाठी हिरो ठरला. त्याने ५ विकेट घेतल्या. बुमराहने एका डावात सातव्यांदा पाच किंवा त्याहून अधिक बळी घेण्याचा पराक्रम केला.
केपटाऊन कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान एक मजेदार घटना घडली. दक्षिण आफ्रिकेच्या प्रत्येक विकेटसोबत टीम इंडियाचा उत्साह वाढत होता. या यशानंतर गोलंदाजही उत्साहात होते. अशा परिस्थितीत त्यांचा उत्साह कमी होता कामा नये, गोलंदाजांच्या प्रोत्साहनात कोणतीही कमतरता राहू नये, याची काळजी स्वत: कर्णधार विराट कोहलीने घेतली. त्यामुळे प्रत्येक विकेट किंवा चांगल्या चेंडूनंतर तो स्वतः टाळ्या वाजवून खेळाडूंना प्रोत्साहन देत होता.
विराट कोहलीने मैदानात बसलेल्या प्रत्येक खेळाडूला टाळ्या वाजवत राहण्यास सांगितले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मोहम्मद सिराज, वृद्धिमान साहा आणि जयंत यादव डगआऊटमध्ये बसलेले दिसत आहेत आणि कर्णधाराचा संकेत मिळताच तेही जोरात टाळ्या वाजवू लागले आहेत. त्याचवेळी मयंक अग्रवाल, केएल राहुल आणि चेतेशनर पुजाराही मैदानावर अशाच प्रकारे टाळ्या वाजवल्या.
सामन्याबाबत…
दुसऱ्या दिवसअखेर भारताने दुसऱ्या डावात १७ षटकात २ बाद ५७ धावा केल्या. आफ्रिकेच्या घातक गोलंदाजीसमोर राहुल-मयंक पुन्हा अपयशी ठरले. भारताकडे आता ७० धावांची आघाडी आहे. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २१० धावांवर आटोपला. कीगन पीरसनने झुंजार फलंदाजी करत ७२ धावांची खेळी केली. भारताकडून जसप्रीत बुमराहने तिखट मारा करत ५ बळी टिपले.