विराट कोहलीने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी त्याने उपाहारापर्यंत नाबाद १५ धावांची खेळी केली. यासह त्याच्या दक्षिण आफ्रिकेत कसोटीत ६२६ धावा आहेत. दक्षिण आफ्रिकेतील कसोटीत भारतासाठी सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने माजी कर्णधार आणि टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला मागे सोडले. आता तो फक्त सचिन तेंडुलकरच्या मागे आहे. तीन सामन्यांची मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे.
विराटने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत ७ कसोटी सामन्यांच्या १३ डावात ५२ च्या सरासरीने ६२६ धावा केल्या आहेत. त्याने २ शतके आणि २ अर्धशतके केली आहेत. त्याने या देशात १५३ धावांची सर्वात मोठी खेळी साकारली आहे. आज आपला ४९वा वाढदिवस साजरा करणाऱ्या राहुल द्रविडने २२ डावात एक शतक आणि २ अर्धशतकांसह ६२४ धावा केल्या. भारताचे फक्त तीन फलंदाज ६०० पेक्षा जास्त धावा करू शकले आहेत. विराटला २ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावता आलेले नाही.
हेही वाचा – IND vs SA : कलाकारी जाफर..! द्रविडसाठी केलं भन्नाट ट्वीट; पोस्ट केला ‘विमल’चा फोटो!
सचिन तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेत भारतीय फलंदाज म्हणून कसोटीत सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने १५ कसोटी सामन्यांच्या २८ डावात ४६ च्या सरासरीने ११६१ धावा केल्या आहेत. त्याच्याशिवाय अन्य कोणत्याही भारतीयाला १००० धावांचा टप्पा गाठता आलेला नाही. सचिनने ५ शतके आणि ३ अर्धशतकेही केली आहेत.
टीम इंडियाला अद्याप दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. नवा प्रशिक्षक राहुल द्रविड यावेळी इतिहास रचू इच्छितो. या मालिकेतील पहिली कसोटी भारताने जिंकली होती, तर दुसरी कसोटी यजमान दक्षिण आफ्रिकेने जिंकली.