भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील निर्णायक कसोटी सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स स्टेडियमवर खेळवला जात आहे. कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने नाणेफेक जिंकल्यानंतर माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने राहुल द्रविड प्रशिक्षक झाल्यानंतर विमल पान मसालाबद्दल एक मीम शेअर केले आहे. द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून भारताने एकही नाणेफेक गमावलेली नाही.
नाणेफेकीनंतर वसीम जाफरने विमल पान मसाल्याच्या पॅकेटच्या दोन्ही बाजूंचा फोटो शेअर केला आणि लिहिले, ”राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून भारताने आठपैकी आठ नाणेफेक जिंकल्या आहेत, भाऊ हेड/टेल करत आहात की हिंदी/इंग्रजी?”
खरे तर, भारतात जेव्हा गल्ली क्रिकेट खेळले जाते, तेव्हा नाणेफेक करण्यासाठी अशा पाकिटांचा वापर केल जातो. तेव्हा हिंदी लिहिलेली किंवा इंग्रजी लिहिलेली पाकिटाची बाजू नाणेफेकीचा कौल ठरवत असते. म्हणून जाफरने थट्टा-मस्करीत असे मीम शेअर केले आहे.
हेही वाचा – IND vs SA : अरे बापरे..! वनडे मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेटपटू आढळला करोना पॉझिटिव्ह!
राहुल द्रविडही आज त्याचा ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे. जाफरनेही द्रविडच्या वाढदिवसानिमित्त एक सुंदर पोस्ट शेअर केली केली आहे. ”कर्णधार, सलामीवीर, क्रमांक ३, विकेटकीपर, आयसीसी स्पर्धा विजेता प्रशिक्षक, माजी एनसीए प्रमुख आणि आता भारताचा प्रशिक्षक, पण त्याहीपेक्षा एक महान माणूस. सर्व ट्रेडच्या मास्टरला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”, असे जाफरने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले.
निर्णायक कसोटी सामन्यासाठी भारताने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. कर्णधार विराट कोहली प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला आहे, त्यानंतर हनुमा विहारीला संघातून वगळण्यात आले आहे. याशिवाय वेगवान गोलंदाज उमेश यादवला दुखापतग्रस्त मोहम्मद सिराजच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे.