भारताचा माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या फलंदाजीवर सातत्याने टीका होत आहे. जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावणाऱ्या रहाणेला केपटाऊन कसोटीच्या पहिल्या डावात दुहेरी आकडाही गाठता आला नाही. रहाणेने केपटाऊन कसोटीच्या पहिल्या दिवशी केवळ नऊ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर रहाणे बाद झाला. पहिल्या दिवसाचा खेळ आटोपल्यानंतर भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर यांनी रहाणेच्या फॉर्मबद्दल मोकळेपणाने भाष्य केले आहे. संघ व्यवस्थापन इतर कोणत्याही फलंदाजाला संधी देण्यापूर्वी रहाणेला आणखी एक संधी देऊ इच्छित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
“रहाणेला आणखी किती संधी दिल्या जातील याबाबत आतापर्यंत कोणतीही चर्चा झालेली नाही. तो सर्वोत्तम प्रयत्न करत आहे, तो नेटमध्ये चांगली फलंदाजी करताना दिसत आहे. या मालिकेत त्याने एक-दोन महत्त्वाच्या खेळी खेळल्या आहेत. फक्त काळजी एवढी आहे की तो त्याचा खेळ मोठ्या स्कोअरमध्ये कसा बदलायचा यासाठी प्रयत्न करत आहे,” असे राठोड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. रहाणेच्या या मालिकेच्या पहिल्या कसोटीत ४८ आणि दुसऱ्या कसोटीत ५८ धावा केल्या आहेत.
IND vs SA 3rd Test Day 1 : २२३ धावांवर आटोपला भारताचा पहिला डाव; आफ्रिकेलाही बसला मोठा धक्का!
“संघ व्यवस्थापन म्हणून आम्हाला आशा आहे की तो यापैकी एका डावात चांगला खेळेल. मी एवढेच म्हणू शकतो की एखाद्या चाहत्याला खेळाडू योग्य वाटतो त्यापेक्षा संघ व्यवस्थापन खेळाडूंना अधिक संधी देते. आम्ही नक्कीच एखाद्याला योग्य वाटते त्यापेक्षा एक अधिक संधी देऊ,” असे राठोड यांनी स्पष्ट केले.
भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी केपटाऊन कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांकडून काही खास खेळ केला नसल्याचे म्हटले आहे. राठोड यांनी कर्णधार विराट कोहलीच्या फलंदाजीचे कौतुक केले, पण बाकीच्या फलंदाजांनाही फटकारले. भारताने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सामन्याच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाची कामगिरी अत्यंत खराब असल्याचे विक्रम राठोड यांनी सांगितले.
भारतीय संघाने कमीत कमी ५०-६० धावा केल्या आहेत, असे विक्रम राठोड यांचे मत आहे. “या आव्हानात्मक परिस्थिती आहेत जिथे धावा काढणे सोपे नसते. आम्ही खूप खराब खेळलो. आम्ही आणखी ५०-६० धावा काढू शकलो असतो, आम्हाला किमान अशीच अपेक्षा होती, असे विक्रम राठोड यांनी म्हटले. भारतासाठी विराटने ७९ धावा केल्या. त्याच्याशिवाय चेतेश्वर पुजाराने ४३ धावांचे योगदान दिले. केएल राहुल आणि मयंक अग्रवाल १२ आणि १५ धावा करून बाद झाले.
सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ अवघ्या २२३ धावांवर ऑलआऊट झाला. जसप्रीत बुमराहने दिवसाचा खेळ संपेपर्यंत डीन एल्गरच्या रूपाने दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का दिला होता. दक्षिण आफ्रिकेने एका विकेटवर १७ धावा केल्या आहेत.