India vs South Africa 2nd Test Match: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघ १५३ धावांत सर्वबाद झाला. चांगली सुरुवात करूनही टीम इंडियाला मोठी धावसंख्या करता आली नाही. एकवेळ अशी होती जेव्हा भारतीय संघाची धावसंख्या चार विकेट्सवर १५३ धावा होती. या धावसंख्येवरच शेवटचे सहा फलंदाज एकही धाव न काढता थेट पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यानंतर टीम इंडियाच्या खात्यात एकही धाव जमा झाली नाही. ११ चेंडूत शून्य धावा आणि सहा विकेट्स, हे चित्र काल तिसऱ्या सत्रात भारतीय डावाचे होते. हे पाहून समालोचन करत असलेले भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक मजेशीर कॅमेट केली आहे. ती तुम्हालाही हसू आवरणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताची धावसंख्या जेव्हा १५३/४ होती तेव्हा विराट कोहली आणि के.एल. राहुल खेळपट्टीवर होते. कोहली ४६ आणि राहुल ८ धावांवर खेळत होता. राहुलला लुंगी एनगिडीने यष्टिरक्षक काइल वेरेयनच्या हाती झेलबाद केले. यानंतर विकेट्स पडण्यास सुरुवात झाली. त्याच्यानंतर एनगिडीने रवींद्र जडेजा (०) आणि जसप्रीत बुमराह (०) यांना बाद केले. एका बाजूने टीम इंडियाचा किल्ला लढवत असणारा विराट (४६ धावा) रबाडाच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये एडन मार्करामकरवी झेलबाद झाला. मग मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा हे दोघे तळाचे फलंदाज खाते न उघडताच बाद झाले. त्यात सिराज हा त्याच्या चुकीमुळे धावबाद झाला.

यावर काय म्हणाले रवी शास्त्री?

सहा विकेट्स शून्यावर पडल्यानंतर रवी शास्त्री म्हणाले, “१५३ वर चार विकेट्स आणि त्यानंतर १५३ धावांत सर्वबाद टीम इंडिया झाली. यादरम्यान जर कोणी टॉयलेटमध्ये जाऊन परतले असेल तर, मी तुम्हाला सांगतो की, भारतीय संघ १५३ धावांवर ऑलआऊट झाला! असे सर्व चाहते आश्चर्यचकित झाले असतील.” शास्त्री पुढे दुसरे उदाहरण देताना म्हणाले, “किंवा कोणीतरी पाणी पिऊन परतले असेल किंवा काही महत्त्वाचा घरातील काम करून आलं असेल तर तोही असाच अवाक् होईल.” शास्त्रींची ही मजेशीर टिप्पणी ऐकून चाहते ही हसायला लागले. त्यांच्या शेजारी असलेले समालोचक देखील स्वतःला हसण्यापासून रोखू शकले नाहीत. त्यांच्या या टिप्पणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, काही चाहत्यांनी खूप शेअर देखील केला आहे.

भारतीय संघाने मोठा विक्रम केला

तत्पूर्वी, मोहम्मद सिराजच्या (६/१५) जबरदस्त गोलंदाजीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात २३.२ षटकांत अवघ्या ५५ धावांत गुंडाळले. भारताने आपल्या ९१ वर्षांच्या कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वात कमी धावसंख्येवर विरोधी संघाला बाद केले. याआधी भारतीय संघाने २०२१ मध्ये मुंबई कसोटीत न्यूझीलंडला ६२ धावांत गुंडाळले होते. त्यानंतर भारतीय संघही १५३ धावांवर गडगडला, पण पहिल्या डावात ९८ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.

हेही वाचा: IND vs SA: दक्षिण आफ्रिकेच्या टिच्चून माऱ्यापुढे टीम इंडिया १५३ धावांत गारद, सहा फलंदाज शून्यावर बाद; सिराजच्या मेहनतीवर फिरवले पाणी

दोन्ही संघांची प्लेइंग११

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, मुकेश कुमार.

दक्षिण आफ्रिका: डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, टोनी डी जिओर्गी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेयन (यष्टीरक्षक), मार्को यान्सन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sa when indias last six wickets fell at zero ravi shastri made a funny comment no one could stop laughing avw