India Tour of South Africa: भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया यजमानांसोबत तीन टी-२०, तीन एकदिवसीय आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची आज (३० नोव्हेंबर) घोषणा होऊ शकते. या मालिकेसाठी अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना टीम इंडियात स्थान मिळेल की नाही, हा चर्चेचा विषय आहे. दोघेही काही काळ कसोटी संघात आत बाहेर जात आहेत. या दोघांची जर अलीकडची कामगिरी पाहिली तर या खेळाडूंनी निराशा केली आहे. अशा स्थितीत पुजारा आणि रहाणेला कसोटी संघात पुनरागमन करणे कठीण दिसत आहे.
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी जेव्हा निवडकर्ते संघ निवडायला बसतील तेव्हा त्यांच्यासमोर अनेक गोष्टी असतील. उदाहरणार्थ, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये संघ निवडण्याव्यतिरिक्त, पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२४ साठी ब्लू प्रिंट तयार करण्यावरही चर्चा होईल. के.एल. राहुल आणि श्रेयस अय्यर कसोटी संघात परतणार आहेत. रहाणे आणि पुजाराच्या पुनरागमनाची शक्यता फारच कमी आहे.
अजिंक्य रहाणेसाठी संघात पुनरागमन करण्याचा मार्ग असू शकतो जर के.एल. राहुलने विकेटकिपिंगची जबाबदारी घेतली आणि इशान किशनला दुसरा यष्टीरक्षक बनवले तर अशा परिस्थितीत संघात अतिरिक्त फलंदाजासाठी जागा असू शकते. मात्र, रहाणेच्या वाढत्या वयाबाबत सर्वात मोठा प्रश्न असल्याने अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड समिती त्याला स्थान देणार की भविष्यासाठी नव्या चेहऱ्यांना पाहणार? हे येत्या काही काळातच समजेल.
अजिंक्य रहाणेने या वर्षी जुलैमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्या मालिकेत त्याची कामगिरी काही खास नव्हती. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने ८ धावा केल्या, तर दुसऱ्या डावात त्याची फलंदाजीची संधीच मिळाली नाही. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात रहाणेने फक्त ३ धावा केल्या. टीम इंडियाने दुसऱ्या डावात फलंदाजी केली नाही. ३५ वर्षीय रहाणे सध्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळत आहे. मात्र, लिस्ट ए क्रिकेटच्या शेवटच्या पाच डावांमधील जर त्याची कामगिरी पाहिली तर त्याने अद्याप एकही शतक किंवा अर्धशतक केलेले नाही. सिक्कीमविरुद्ध १५ धावा करून तो नाबाद परतला आणि केरळविरुद्ध नाबाद ३४ धावा केल्या. त्याने रेल्वे आणि पुद्दुचेरीविरुद्ध अनुक्रमे ३ आणि ८ धावा केल्या.
३५ वर्षीय चेतेश्वर पुजाराही कसोटी संघात पुनरागमन करून विशेष काही मोठी खेळी करू शकला नाही. गेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खराब कामगिरीनंतर पुजाराला कसोटी संघातून वगळण्यात आले होते, मात्र, कौंटीमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर तो परतला होता. त्याला वेस्ट इंडिज दौऱ्यातूनही बाहेर ठेवण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पुजाराची बॅट पुन्हा शांत राहिली. ओव्हलवर खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात त्याने १४ धावा केल्या, तर दुसऱ्या डावात तो २७ धावा करून तंबूत परतला.
पुजारा सध्या विजय हजारे ट्रॉफीमध्येही खेळत आहे. या लिस्ट ए स्पर्धेतील शेवटच्या तीन डावांमध्ये पुजाराची धावसंख्या १५, २४ आणि शून्य आहे. ओडिशाविरुद्ध तो १५ धावा करून बाद झाला, तर त्रिपुराविरुद्ध त्याने २४ धावा केल्या. पुद्दुचेरीविरुद्ध त्याला खातेही उघडता आले नाही. याआधी तो कौंटीही खेळला होता पण तिथेही त्याची कामगिरी निराशाजनक होती. गेल्या महिन्यात झालेल्या इराणी चषक फायनलमध्ये शेष भारताकडून खेळताना पुजारा आपली छाप पाडू शकला नाही.