भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेपूर्वी पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार रोहित शर्माने टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा कोणताही विचार नसल्याचे सांगितले. यासोबतच त्याने भारतीय संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबतही मोठा अपडेट दिला आहे. रोहित म्हणाला की, तुम्ही सतत सामने खेळत राहणे शक्य नाही. तिन्ही फॉरमॅट खेळणाऱ्या खेळाडूंना पुरेशी विश्रांती द्यावी लागेल. मीही अशाच खेळाडूंपैकी एक आहे. आम्हाला न्यूझीलंडविरुद्ध तीन टी२० सामने खेळायचे आहेत. आयपीएलनंतर काय होते ते पाहू. मी अद्याप हे स्वरूप सोडण्याचा निर्णय घेतलेला नाही.
यासोबतच रोहितने सांगितले की, नेटमध्ये गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहला कडकपणा जाणवत होता. यामुळे तो एकदिवसीय मालिकेत खेळत नाहीये. मीडिया रिपोर्ट्सनुसार, BCCI भारताच्या टी२० संघात युवा खेळाडूंना संधी देऊ इच्छिते आणि या फॉरमॅटचे कर्णधार हार्दिक पांड्याकडे देऊ इच्छिते. टी२० विश्वचषकानंतर, भारताने दोन टी२० मालिका खेळल्या आणि दोन्हीमध्ये वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. दोन्ही मालिकांमध्ये हार्दिक पांड्याने टीम इंडियाचे नेतृत्व केले होते. यानंतर कर्णधार रोहित शर्माशिवाय माजी कर्णधार विराट कोहली आणि माजी उपकर्णधार लोकेश राहुल यांनाही भारताच्या टी२० संघातून वगळण्यात आले असून त्यांच्या जागी निवड समिती युवा खेळाडूंना संधी देऊ इच्छित असल्याचे मानले जात आहे.
२०२४ मध्ये वेस्ट इंडिजमध्ये टी२० विश्वचषक होणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयला हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ तयार करायचा आहे आणि त्याची सुरुवात गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी२० मालिकेने झाली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका १० जानेवारीपासून सुरू होत आहे. या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली आणि लोकेश राहुल व्यतिरिक्त जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे देखील भारतीय संघात पुनरागमन करणार होते, मात्र जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर आहे. मात्र, या मालिकेत उर्वरित सीनियर खेळाडू अॅक्शन करताना दिसणार आहेत.
द्विशतकवीर इशान किशन रोहितचा सलामीवीर म्हणून पहिली पसंती नाही
या मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघात शिखर धवनला स्थान देण्यात आलेले नाही. इशान किशन व शुबमन गिल हे दोन फलंदाज रोहित शर्मासह सलामीसाठी शर्यतीत आहेत. संघ व्यवस्थापनाने लोकेश राहुलवर यष्टिरक्षण व चौथ्या क्रमांकावर फलंदाजी अशी नवीन जबाबदारी दिली आहे. पण, इशान किशनला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवल्यानंतर यष्टींमागे कोण दिसेल, याची उत्सुकता होती. बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावणाऱ्या किशनला श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत संधी मिळण्याची शक्यता नाही. रोहितनेही सांगितले. ”दुर्दैवाने इशान किशनला आम्हाला संधी देता येणार नाही. शुबमन गिल याला योग्य संधी मिळायला हवी,”असे मत रोहितने व्यक्त केले.
लोकेश राहुलची कामगिरी चांगली झाली नाही किंवा त्याला प्लेइंग ११मधून वगळले तर टीम इंडियाला यष्टिरक्षकाची गरज भासेल. अशा परिस्थितीत इशान किशन आपली जागा बनवू शकतो. श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात फक्त दोनच यष्टिरक्षक फलंदाज आहेत. या दोन खेळाडूंपैकी फक्त एक खेळाडू प्लेइंग इलेव्हनमध्ये आपले स्थान निश्चित करू शकेल. श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेत इशानची कामगिरी काही खास नव्हती. त्याने ३ सामन्यांत केवळ ४० धावा केल्या आहेत.
सामना कधी, कुठे, कसा आणि किती वाजता
भारत आणि श्रीलंका यांच्यातील ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका १० जानेवारीपासून सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना मंगळवारी गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरू होईल, तर नाणेफेक दुपारी १.०० वाजता होईल. नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह अनेक वरिष्ठ खेळाडू एकदिवसीय मालिकेतून पुनरागमन करत आहेत. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणते बदल पाहायला मिळतील, याची सर्वांना उत्सुकता होती. रोहितने आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्याचा निर्णय जाहीर करून टाकला. सामना स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टारवर थेट प्रेक्षपण पाहू शकता.