IND vs SL 1st ODI Match Tie : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला शुक्रवारी सुरुवात झाली आहे. कोलंबो येथे झालेल्या मालिकेतील पहिला सामना टाय झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ८ गडी गमावून २३० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाला अंतिम टप्प्यात शिवम दुबे विजय मिळवून देईल असे वाटत होते, परंतु तो एलबीडब्ल्यू आऊट झाल्याने भारतीय संघ २३० धावांवर गारद झाला. ज्यामुळे हा सामना बरोबरीत सुटला. तत्पर्वी कर्णधार रोहित शर्माने खेळलेली अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली.
टीम इंडियाला कर्णधार रोहित शर्माने चांगली सुरुवात करून दिली, त्याने कठीण खेळपट्टीवरही ४७ चेंडूत ५८ धावा केल्या. यादरम्यान त्याने ७चौकार आणि ३षटकारही लगावले. एकेकाळी भारताने एकही विकेट न गमावता ७५ धावा केल्या होत्या, मात्र त्यानंतर संघ मोठ्या भागीदारीसाठी संघर्ष करताना दिसला. या सामन्यात भारताच्या पुनरागमनात केएल राहुल आणि अक्षर पटेल यांच्या ५७ धावांच्या भागीदारीने महत्त्वाची भूमिका बजावली. शेवटी, शिवम दुबेने २५ धावांची छोटी खेळी खेळली, पण तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. शिवम दुबेला एलबीडब्ल्यू आऊट देण्यात आले, जो निर्णय वादग्रस्त ठरला.
रोहित शर्माची अर्धशतकी खेळी –
प्रथम खेळताना श्रीलंकेने २३० धावा केल्या होत्या, ज्यामध्ये सर्वात मोठे योगदान दुनिथ वेल्लालागेचे होते. ज्याने ६५ चेंडूत ६७ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्याशिवाय पथुम निसांकाने ७५ चेंडूत ५६ धावा केल्या. यानंतर अर्धा संघ १०१ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतरही श्रीलंकेला २३० धावांपर्यंत मजल मारण्यात यश आले. दुसरीकडे लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरली, तेव्हा कर्णधार रोहित शर्माने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी सुरू केली. रोहित क्रीजवर होता तोपर्यंत संघाचा धावगती ६ च्या वर होती, पण ‘हिटमॅन’ १३व्या षटकात ४७ चेंडूत ५८ धावा काढून बाद झाला. तो बाद झाल्यानंतर अवघ्या ५ धावांनंतर शुभमन गिलही १६ धावा करून माघारी परतला.
हेही वाचा – IPL 2025 : ‘या’ खेळाडूंवर आयपीएलमध्ये दोन वर्षांची बंदी? सर्वच संघ चिंतेत! नेमकं कारण काय? जाणून घ्या
आज वॉशिंग्टन सुंदरला फलंदाजीसाठी चौथ्या क्रमांकावर पाठवण्यात आले होते, तो केवळ ५ धावा करून बाद झाला. विराट कोहलीही जवळपास ९ महिन्यांनंतर एकदिवसीय सामना खेळण्यासाठी मैदानात आला होता, मात्र त्याला केवळ २४ धावा करता आल्या. गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर, श्रेयस अय्यर संघात परतला आणि त्याला मोठी खेळी खेळून संघात आपले स्थान पक्के करण्याची संधी होती, परंतु त्याची बॅट तळपताना दिसली नाही तो केवळ २३ धावा करू शकला.
केएल राहुल अक्षर पटेलची भागीदारी –
एकेकाळी भारतीय संघाने १३२ धावांवर ५ विकेट्स गमावल्या होत्या आणि तरीही विजयासाठी ९९ धावा करायच्या होत्या. येथून केएल राहुल आणि अक्षर पटेल यांच्यात अर्धशतकी पण अत्यंत महत्त्वाची भागीदारी रचली गेली. केएल राहुलने ४३ चेंडूत ३१ धावा केल्या, तर अक्षर पटेलने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीच्या कौशल्याने सर्वांना प्रभावित केले. त्याने ५७ चेंडूत ३३ धावा केल्या. राहुल आणि अक्षर यांनी मिळून ५७ धावा जोडल्या. पण ही भागीदारी टीम इंडियासाठी कामी येऊ शकली नाही, कारण सामना बरोबरीत सुटला.
चारिथ असलंकाने सामन्याला दिली कलाटणी –
भारतीय संघाने ४७ षटकानंतर ८ गडी गमावून २२६ धावा केल्या होत्या आणि विजयासाठी फक्त ५ धावा करायच्या होत्या. 48 व्या षटकात श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंका गोलंदाजीसाठी आला. ओव्हरच्या पहिल्या दोन चेंडूंवर एकही धाव आली नाही, पण तिसऱ्या चेंडूवर चौकार आला. अशा स्थितीत भारताला विजयासाठी १५ चेंडूत केवळ एक धाव करायची होती. दुबे पुढच्याच चेंडूवर २५ धावांवर चौकार मारून बाद झाला. भारताला एका धावेची गरज होती, पण फक्त एक विकेट हातात उरली होती. पुढच्याच चेंडूवर असलंकाने अर्शदीप सिंगलाही बाद केले. यासह हा सामना बरोबरीत सुटला आहे.
© IE Online Media Services (P) Ltd