भारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यान एकदिवसीय मालिकेतील पहिला मंगळवारी (१० जानेवारी) खेळला गेला. गुवाहाटी येथील बारसपारा स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली. विराटने या सामन्यात आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील ४५वे शतक पूर्ण केले. त्याचबरोबर त्याने मायदेशात क्रिकेटच्या सर्वाधिक एकदिवसीय प्रकारातील शतक झळकावण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकर याची बरोबरी केली. या शतकी खेळीबद्दल क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने त्याचे कौतुक केले आहे.
सामना सुरू झाला तेव्हा इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांना संघात न दिसल्याने चाहत्यांची निराशा झाली, मात्र जसजसा सामना पुढे सरकत गेला तसतशी चाहत्यांच्या निराशेचे आनंदात रूपांतर झाले. चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा फलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून विराट कोहली होता, ज्याने गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर शानदार शतक झळकावून नवीन वर्षाची सुरुवात केली. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील ४५वे शतक होते.
कोहलीचे ७३ वे आंतरराष्ट्रीय शतक
कोहलीने ८० चेंडूत शतक पूर्ण केले. त्याचे क्रिकेट कारकिर्दीतील हे ७३वे आंतरराष्ट्रीय शतक आहे. नुकतेच त्याने बांगलादेशविरुद्ध आपले ७२वे शतक झळकावले. कोहलीची ही खेळी टीम इंडियासाठी खूप खास आहे, कारण हे वर्ल्ड कपचे वर्ष आहे आणि कोहली टीम इंडियासाठी मॅच विनर ठरू शकतो.
सचिनने कोहलीचे कौतुक केले
सचिन तेंडुलकरनेही कोहलीच्या या शानदार खेळीचे कौतुक केले आहे. कोहलीचा फोटो शेअर करत त्याने लिहिले की, ‘विराट अशीच कामगिरी करत राहा, भारताला अभिमान वाटावा. एवढेच नाही तर सचिन तेंडुलकरने भारतीय टॉप ऑर्डरच्या फलंदाजांचेही कौतुक केले. भारताकडून एक शतक आणि दोन अर्धशतके झाली. श्रीलंकेविरूद्ध पहिल्या वन डे सामन्यात या दोघांनीही गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. टी२० मालिकेत विश्रांती घेतल्यानंतर, रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघांनी आज दमदार कमबॅक केलं. विराटने शानदार शतक झळकावले. त्याने ११३ धावा कुटल्या. तर रोहित शर्माला शतकाने हुलकावणी दिली, पण त्याने ८३ धावांची अप्रतिम खेळी केली. या दोघांसह सलामीवीर शुबमन गिलनेही शानदार ७० धावा केल्या. भारताच्या या कामगिरी खुद्द क्रिकेटचा देव खुश झाला आणि मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्विट करत त्यांचे कौतुक केले.