भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. भारतात खेळल्या जाणाऱ्या या मालिकेतील पहिला सामना मंगळवारी (१० जानेवारी) गुवाहाटीमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यातून भारताचे अनेक वरिष्ठ खेळाडू संघपुनरागमन करत आहेत. यामुळे पुन्हा एकदा रोहित शर्मा भारतीय कर्णधाराच्या रुपात दिसणार आहे. रोहित शर्माने म्हटले आहे की, भारतीय व्यवस्थापन इशान किशनच्या जागी शुबमन गिलला योग्य संधी देऊ इच्छित आहे. मात्र या निर्णयावर टीम इंडियाचा माजी वेगवान व्यंकटेश प्रसादने नाराजी व्यक्त केली आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत इशान किशनऐवजी शुबमन गिलला खेळवण्याची घोषणा करताना भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद रोहित शर्माच्या निर्णयावर नाराज आहे. टीम इंडियाच्या मुख्य निवडकर्ता पदासाठी नुकताच अर्ज केलेला व्यंकटेश प्रसाद म्हणाला की, “यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनवर अन्याय होईल.” प्रसाद म्हणाला की, “चितगावमध्ये बांगलादेशविरुद्ध द्विशतक झळकावल्यानंतर त्याला मागच्या बाजूला खेळण्याची संधी मिळायला हवी होती.”
व्यंकटेश प्रसाद इशान किशनच्या समर्थनार्थ मैदानात उतरला
क्रिकट्रॅकरच्या ट्विटला उत्तर देताना व्यंकटेश प्रसाद याने एक टिप्पणी केली आहे. प्रसादने लिहिले, “नीट, बरोबर, व्यवस्थित विचार करा, पहिल्या दोन सामने आणि मालिका गमावल्यानंतर द्विशतक झळकावणाऱ्या खेळाडूला संधी दिली पाहिजे. गिलसाठी जगात खूप वेळ आहे पण द्विशतक झळकावणाऱ्या खेळाडूला तुम्ही वगळू शकत नाही.”
शुबमन गिलला चांगली संधी मिळाली पाहिजे – रोहित शर्मा
गुवाहाटीतील बारसापारा स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत रोहित शर्मा म्हणाला, “दोन्ही खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ओपनिंग करताना दोन्ही खेळाडूंनी जी कामगिरी केली आहे, ती लक्षात घेऊन शुबमन गिलला योग्य संधी देणे योग्य ठरेल.” रोहित पुढे म्हणाला, “गेल्या काही सामन्यांमध्ये गिलने चांगली कामगिरी केली आहे. त्याने खूप धावाही केल्या आहेत. त्याशिवाय मी इशानकडून काहीही हिरावून घेत नाही, तो आमच्यासाठी शानदार आहे आणि त्याने द्विशतकही झळकावले आहे. याचा अर्थ मला माहीत आहे.”
गुवाहाटीच्या बरसापरा स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी पूरक आहे. या खेळपट्टीवर अधिक धावा होण्याची शक्यता आहे. यामुळे गोलंदाजांसमोर मोठे आव्हान असणार आहे. या खेळपट्टीवर आतापर्यंत एकच वनडे सामना खेळला गेला. जो भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात २०१८ मध्ये खेळला गेला. त्या सामन्यात भारताने विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली प्रथम क्षेत्ररक्षण निवडले होते. त्यामध्ये विराटने १४० धावा केल्या होत्या. त्याचबरोबर रोहित शर्मा याने नाबाद १५२ धावा केल्या होत्या. यामुळे भारताने ३२२ धावांचे लक्ष्य ८ विकेट्स आणि ४७ चेंडू राखतच जिंकले होते.