IND vs SL 1st ODI Team India Wearing BlackBand : आज भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू झाली आहे. पहिला सामना कोलंबोमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेचा नवा कर्णधार चारिथ असलंकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, या सामन्यात भारतीय खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरले. ज्यामुळे भारतीय चाहत्यांना उत्सुकता निर्माण झालीय की खेळाडूंनी का बांधली? याचे कारण काय आहे जाणून घेऊया.
अंशुमन गायकवाड यांच्या मृत्यूमुळे घेतला निर्णय –
कोलंबो येथे खेळल्या जात असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा संघ प्रथम फलंदाजी करत आहे. भारताचे सर्व अकरा खेळाडू आज मैदानात उतरले, तेव्हा त्यांच्या हातावर काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या. खरं तर, अलीकडेच भारताचे महान क्रिकेटपटू आणि माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचे निधन झाले. त्यामुळे भारतीय संघाने शोक व्यक्त करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड हे बऱ्याच दिवसांपासून कर्करोगाने त्रस्त होते. त्यांना ब्लड कॅन्सर झाला होता, ज्यासाठी त्यांच्यावर लंडनमध्ये उपचार सुरू होते. बीसीसीआयने गायकवाड यांच्या कुटुंबीयांना उपचारासाठी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सर्व प्रयत्न करूनही गायकवाड यांना वाचवता आले नाही.
अंशुमन गायकवाड यांची कारकीर्द –
अंशुमन गायकवाड हे भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षकही होते. १९७४ मध्ये त्यांनी टीम इंडियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी १९७४ ते १९८४ दरम्यान एकूण ४० कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये त्यांनी २९.६३ च्या सरासरीने १९८५ धावा केल्या, त्या दरम्यान गायकवाड यांनी दोन शतके आणि १० अर्धशतकेही झळकावली. तसेच त्यांनी १५ एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण २६९ धावा केल्या, ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.
पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :
श्रीलंका : पाथुम निसांका, कुसल मेंडिस, सदिरा समराविक्रमा, कामिंदू मेंडिस, चारिथ असालंका (कर्णधार), जनित लियानागे, दुनित वेललागे, वानिंदू हसरंगा, महिष तिकशाना, मोहम्मद शीराज, असिता फर्नांडो.
हेही वाचा – Paris Olympics 2024 : ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या भारतीयांसाठी मोठी घोषणा, दिग्गज उद्योगपती देणार अलिशान…
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.