भारतीय संघाने २०२३ मध्ये चांगली सुरुवात केली आहे. या वर्षातील पहिल्याच सामन्यात त्याने रोमहर्षक विजयाची नोंद केली आहे. भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना २ धावांनी जिंकला आहे. हा सामना मुंबईत झाला. यासह टीम इंडियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ५ गडी गमावून १६२ धावा केल्या. दीपक हुडा आणि अक्षर पटेल यांनी ३५ चेंडूत ६८ धावांची भागीदारी केली, ज्यामुळे अखेरीस भारतीय संघ चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचला. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ केवळ १६० धावा करू शकला. ज्यामुळे भारतीय संघाने हा सामना २ धावांनी जिंकला.
रणनीतीनुसार अक्षरला शेवटचे षटक देण्यात आले –
बॅटने अप्रतिम कामगिरी करुन दाखवणाऱ्या अक्षर पटेलने गोलंदाजीतही शानदार प्रदर्शन केले. त्याने एकही विकेट घेतली नाही, पण शेवटच्या षटकात १३ धावा वाचवून त्याने टीम इंडियाला नक्कीच विजय मिळवून दिला. शेवटच्या षटकात श्रीलंकेला १३ धावांची गरज असताना कर्णधार हार्दिक पंड्याने अक्षरवर विश्वास दाखवला. कर्णधाराने अक्षरला शेवटचे षटक का दिले याचा खुलासाही त्याने केला.
हार्दिक पांड्याने फिरकीपटू अक्षर पटेलला शेवटचे षटक देणे रणनीतीचा एक भाग होता. सामना संपल्यानंतर त्याने हा खुलासा केला. कर्णधार पांड्या म्हणाला, ”मला मुद्दाम या संघाला कठीण परिस्थितीत ठेवायचे आहे, कारण मोठे सामने आणि कठीण परिस्थितीत ते आम्हाला खूप मदत करेल. द्विपक्षीय मालिकेत आम्ही चांगले आहोत. भविष्यातही आम्ही अशाच आव्हानांचा सामना करणार आहोत.”
पांड्या स्विंग गोलंदाजीचा करत आहे सराव –
तो म्हणाला, ”खरं सांगायचं तर सर्व तरुण मुलांनी कठीण परिस्थितीत चमकदार कामगिरी केली आहे. आमच्या दोघांमध्ये साधारण बातचीत झाली. मी त्याला (शिवम मावी) आयपीएलमध्ये गोलंदाजी करताना पाहिले आहे, त्यामुळे मला त्याची ताकद माहित होता. मी त्याला आरामात गोलंदाजी करायला सांगितले. मोठ्या हिट्सची काळजी करू नको, असे देखील सांगितले. मी माझ्या स्विंग बॉलिंगवरही खूप मेहनत घेत आहे. मला इनस्विंगमध्येही खूप मदत मिळत आहे. मी नेटमध्ये खूप सराव करत आहे. मला नवीन चेंडूने गोलंदाजी करायला आवडते.”
पांड्याने दुखापतीबाबत दिली माहिती –
हार्दिक पांड्या म्हणाला, ”आता, हो एकदम (कर्णधार म्हणायची सवय झाली आहे). हे फक्त क्रॅम्प आहे. आता लोकांना घाबरवण्यासारखी माझी प्रवृत्ती आहे, पण जेव्हा मी हसतो, तेव्हा समजून घ्या की सर्वकाही ठीक आहे. मला नीट झोप येत नव्हती. पाणीही योग्य प्रमाणात प्यायलो नव्हतो. यामुळेच ग्लुट्स थोडे अकडले होते.”