भारतीय संघ २०२३ मधील पहिला सामना मंगळवारी (३ जानेवारी) मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळत आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १६२ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर श्रीलंका संघाला १६३ धावांचे लक्ष्य दिले आहे. या सामन्यात शिवम मावीने शानदार पदार्पण करताना दोन विकेट्स घेतल्या आहेत.
१६३ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या श्रीलंका संघाची सुरुवात अडखळत झाली. कारण संजू सॅमसनने पांड्याच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर कुसल मेंडिसचा झेल सोडला. त्यानंतर पदार्पण करणाऱ्या शिवम मावीला आपली पहिली विकेट मिळाली. त्याने श्रीलंकेचा सलामीवीर पथुम निसांका बाद करुन आपली पहिली विकेट मिळवली. डावाच्या दुसऱ्या षटकातील पाचव्या चेंडूवर मावीने निसांकाला इनस्विंग चेंडूवर बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. निसांका ३ चेंडूत एक धाव काढून बाद झाला.
शिवम मावीला धनंजयच्या रुपाने दुसरे यश मिळाले –
युवा वेगवान गोलंदाज शिवम मावीने भारताला आणखी एक यश मिळवून दिले. मावीने आपल्या दुसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर धनंजय डी सिल्वाला संजू सॅमसनकरवी झेलबाद करून श्रीलंकेला दुसरा धक्का दिला. डी सिल्वा ६ चेंडूत ८ धावा करून बाद झाला. अशा पद्धतीनने शिवम मावीने आपले पदार्पण संस्मरणीय केले.
दरम्यान उमरान मलिकने भारताला तिसरे यश मिळवून दिले. त्याचबरोबर हर्षल पटेलने देखील एक विकेट घेतली. ज्यामुळे श्रीलंका संघाने १० षटकांच्या समाप्तीनंतर ६६ धावा करताना ४ विकेट्स गमावल्या आहेत. त्यामुळे आता श्रीलंका संघाला ६० चेंडूत ९७ धावांची गरज आहे.