IND vs SL 2nd ODI Rohit Sharma broke Rahul Dravid Record : भारत आणि श्रीलंका यांच्यात वनडे मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ९ गडी गमावून २४० धावा केल्या. ज्यामुळे भारताला विजयासाठी २४१ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. या सामन्यात शुबमन गिलने कर्णधार रोहित शर्मासह भारताच्या डावाची सलामी दिली. या सामन्यात रोहित शर्माने २ धावा करताच राहुल द्रविडचा मोठा विक्रम मोडीत काढला.
रोहित शर्माने राहुल द्रविडला टाकले मागे –
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्माने २ धावा करताच राहुल द्रविडला मागे टाकले. रोहित शर्मा आता वनडे फॉर्मेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे, जिथे राहुल द्रविड आधी होता. रोहित शर्माने आतापर्यंत वनडे सामन्यांमध्ये भारतासाठी १०,७६९ धावा (वृत्त लिहिपर्यंत) केल्या आहेत. त्याचबरोबर राहुल द्रविडने त्याच्या वनडे कारकिर्दीत १०,७६८ धावा केल्या आहेत.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने या फॉरमॅटमध्ये १८,४२६ धावा केल्या आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानावर विराट कोहली आहे, ज्याने १३,८७२ धावा केल्या आहेत तर तिसऱ्या स्थानावर माजी कर्णधार सौरव गांगुली आहे ज्याने ११,२२१ धावा केल्या आहेत. रोहित शर्मा आता चौथ्या स्थानावर तर राहुल द्रविड पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. एमएस धोनी १०,५९९ धावांसह यादीत सहाव्या स्थानावर आहे.
हेही वाचा – Paris Olympics 2024 : तिरंदाज आणि लक्ष्यादरम्यानचं अंतर पाहून चक्रावून जाल, VIDEO होतोय व्हायरल
वनडे क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –
१८४२६ – सचिन तेंडुलकर
१३८७२ – विराट कोहली (वृत्त लिहिपर्यंत)
११२२१ – सौरव गांगुली
१०७६९ – रोहित शर्मा (वृत्त लिहिपर्यंत)
१०७६८ – राहुल द्रविड
१०५९९ – एमएस धोनी
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने भारताला २४१ धावांचे लक्ष्य दिले आहे. अविष्का फर्नांडो आणि कामिंदू मेंडिस यांच्या शानदार खेळीच्या जोरावर श्रीलंकेने ५० षटकांत नऊ गडी गमावून २४० धावा केल्या. भारतातर्फे वॉशिंग्टन सुंदरने १० षटकांत ३० धावांत सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या, तर कुलदीप यादवने २ विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी एक विकेट्स मिळाली.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र मोहम्मद सिराजने पहिल्याच चेंडूवर पथुम निसांकाला बाद करून भारताला सुरुवातीचे यश मिळवून दिले. मात्र, अविष्का फर्नांडो आणि कुसल मेंडिस श्रीलंकेचा डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली. मात्र, मधल्या षटकांमध्ये विकेट घेण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. शेवटी दुनिथ वेल्लालगे आणि कामिंडू मेंडिस यांनी चांगली खेळी खेळून श्रीलंकेला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत नेले.