भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. गुवाहाटीमध्ये झालेल्या पहिल्या एकदिवसीय भारताने ६७ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामध्ये भारताने विराट कोहलीच्या ११३ आणि कर्णधार रोहित शर्माच्या ८३ धावांच्या जोरावर ३७३ धावसंख्येचा डोंगर उभारला होता. यामधील दुसरा सामना गुरूवारी (१२ जानेवारी) कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या मैदानावर जेव्हा हे दोन संघ एकदिवसीयमध्ये शेवटी समोरा-समोर आले होते, तेव्हा एकदिवसीय सामन्याचा इतिहास बदलला होता. गुवाहाटीमध्ये झालेल्या सामन्यात दोन्ही संघानी फलंदाजीत उत्तम कामगिरी केली, मात्र गोलंदाजी काही प्रमाणात ढिसाळ झाली. यामुळे दोन्ही संघात काही बदल होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुवाहाटीमध्ये विराटच्या शानदार शतकाच्या बळावर भारताने श्रीलंकेविरुद्ध अव्वल फळीतील शुबमन गिल आणि रोहितच्या अर्धशतकांच्या जोरावर ३७३ धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात रोहित आणि विराट आणि इतर खेळाडूंकडून पुन्हा मोठी खेळी खेळण्याची भारतीय संघाची अपेक्षा असेल. रोहितने गेल्या तीन वर्षांपासून एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक झळकावलेले नाही. त्याने १९ जानेवारी २०२० रोजी बंगळुरू येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११९ धावांचे शतक झळकावले. यानंतर त्याने १२ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या बॅटने चार अर्धशतके केली आहेत, परंतु एकही शतक झळकावलेले नाही. गुरुवारीही रोहित आकर्षक खेळी करेल अशी क्रिकेट चाहत्यांची अपेक्षा असेल.

श्रेयस, राहुलकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल

पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित आणि गिलच्या चांगल्या सुरुवातीनंतर विराट कोहलीने श्रेयस अय्यरसोबत ४० धावांची आणि केएल राहुलसोबत ९० धावांची भागीदारी रचून मोठी धावसंख्या उभारली. भारतीय संघ व्यवस्थापन आधीच विश्वचषकासाठी संघाला अंतिम स्वरूप देण्यात व्यस्त आहे. अशा स्थितीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या श्रेयस आणि पाचव्या क्रमांकावर असलेल्या राहुलला आपले स्थान निश्चित करण्यासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करणे आवश्यक आहे, कारण जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा टी२० फलंदाज सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकासाठी दार ठोठावत आहे. गोलंदाजीत मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक यांनी बारसापारा स्टेडियमवर चांगली गोलंदाजी केली. श्रीलंकेचा संघ ३०० हून अधिक धावा करण्यात यशस्वी ठरला असला, तरी गोलंदाजांनी कंबर कसली पाहिजे.

हेही वाचा: मिस्टर ३६० हा एकच! “सूर्यकुमारची स्टाईल मारायला गेला आणि…!” ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ फलंदाजाच्या शॉटचा Video व्हायरल

श्रीलंका पलटवार करणार का?

भारतीय संघाने पहिला एकदिवसीय सामना जिंकला असेल पण श्रीलंकेच्या खेळाडूंना परत मारा करायला आवडेल. नुकत्याच झालेल्या टी२० मालिकेत भारताने पहिला सामना जिंकला होता, मात्र दुसरा सामना जिंकून श्रीलंकेने पुनरागमन केले. मात्र, भारताने तिसरा सामना जिंकून मालिका २-१ अशी जिंकली. त्याचवेळी गुवाहाटीमध्ये १७९ धावांवर सात विकेट गमावल्यानंतर सलामीवीर पाथुम निसांकाचे (७२) अर्धशतक आणि कर्णधार दासुन शनाकाच्या नाबाद १०८ धावांच्या जोरावर श्रीलंकेचा संघ ८ बाद ३०६ धावा करू शकला. वेगवान गोलंदाज कसून रजिता आणि फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगा हे भारतीय फलंदाजांना अडचणीत आणू शकतात. त्यामुळे श्रीलंकेला पुनरागमन करण्यापासून रोखण्यासाठी भारतीय फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी सर्वोत्तम कामगिरी करण्याची गरज आहे.

टीम इंडिया १७ वर्षांपासून प्रत्येक मालिका जिंकत आहे

२००६ मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका ०-० अशी ड्रॉ झाली होती. यानंतर, यापूर्वीच्या सर्व नऊ मालिका भारताने श्रीलंकेकडून जिंकल्या होत्या. दुसरीकडे, ईडन गार्डन्सबद्दल बोलायचे झाल्यास, भारत आणि श्रीलंका येथे एकूण पाच एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये भारताने तीन सामने जिंकले आहेत, तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. १९९६ च्या विश्वचषकातील उपांत्य फेरीत श्रीलंकेने एक सामना जिंकला.

मात्र, हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. श्रीलंकेने भारताला २५२ धावांचे लक्ष्य दिले होते, भारतीय संघाने ३४.१ षटकात ८ गडी गमावून १२० धावा केल्या होत्या. विनोद कांबळी आणि अनिल कुंबळे मैदानात होते, मात्र चाहत्यांच्या दंगलीमुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही आणि श्रीलंकेला विजयी घोषित करण्यात आले.

हेही वाचा: Prithvi Shaw: “मी काय…सीधे इग्नोर कर देते हु”, सोशल मीडिया ट्रोलिंगला भारताचा स्टार पृथ्वी शॉ ने केला खुलासा

संभाव्य प्लेईंग-११

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.

श्रीलंका: दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, चरित अस्लंका, धनंजय डिसिल्व्हा, वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, कसून राजिता, दुनित वेलाल्गे, दिलशान कुमार/दिल्शान कुमार/

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sl 2nd odi will rohit sharma repeat eight years ago history what colors will the pitch at eden gardens show know playing 11 avw