IND vs SL 2nd T20 Updates: भारत आणि श्रीलंका संघात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकला. त्यामुळे भारतीय संघाकडे १-० ने मालिकेत आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना एमसीए स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यांची नाणेफेक पार पडली आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निर्णय घेतला आहे.
आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली. त्यानुसार भारतीय संघात फक्त दोन बदल करण्यात आले आहेत. संजू सॅमसनच्या जागी राहुल त्रिपाठीला टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये पदार्पणाची संधी मिळाली आहे. राहुल त्रिपाठीला १०३ क्रमांकाची पदार्पण कॅप विक्रम राठोड यांच्या हातून मिळाली.
२०२२ मध्ये आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी देखील त्रिपाठीची पहिल्यांदाच संघात निवड झाली होती. मात्र यादरम्यान त्याला पदार्पणाची संधी मिळाली नव्हती. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचे दुखापतीनंतर पुनरागमन झाले आहे. त्याला हर्षल पटेलच्या जागी स्थान मिळाले.
कोण आहे राहुल त्रिपाठी?
राहुल त्रिपाठीचा जन्म रांची (झारखंड) येथे झाला. तो उजव्या हाताचा फलंदाज आहे. ३१ वर्षीय फलंदाज २०१० पासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्राकडून खेळत आहे. त्याने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबादचा प्रतिनिधित्व केले आहे. राहुल त्रिपाठीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आतापर्यंत ५२ सामन्यांत २७२८ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ५३ लिस्ट-ए सामन्यात १७८२ धावा केल्या. याशिवाय टी-२० क्रिकेटमध्ये १२५ सामने खेळताना त्याने २८०१ धावा केल्या आहेत.
भारताची प्लेइंग इलेव्हन: इशान किशन (यष्टीरक्षक), शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, अक्षर पटेल, शिवम मावी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.
हेही वाचा – IND vs SL T20 Series: सॅमसनने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिले परतीचे संकेत; म्हणाला, ‘ऑल इज …’
श्रीलंकेची प्लेइंग इलेव्हन: पथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), धनंजया डी सिल्वा, चरित असलंका, भानुका राजपक्षे, दासुन शनाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश थेक्षाना, कसून राजीथा आणि दिलशान मदुसन