India vs Sri Lanka 2nd T20: भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने भारताचा १६ धावांनी पराभव केला. यासह श्रीलंका संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील भारताचा हा पहिलाच पराभव आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने भारतासमोर २०७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात टीम इंडियाला आठ विकेट्स गमावून केवळ १९० धावाच करता आल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजचा सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये खेळला जात आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टी२० सामन्यात श्रीलंकेने टीम इंडियाचा १६ धावांनी पराभव केला. उभय संघांतील पहिला टी२० सामना भारताने अवघ्या दोन धावांच्या अंतराने जिंकला होता. भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी२० सामना होत असून हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिला सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. मालिकेतील हा दुसरा सामना जिंकून भारताकडे मालिका नावावर करण्याची संधी होती. पण या महत्वाच्या सामन्यात अर्शदीप सिंग याने एका षटकात तीन नो बॉल टाकण्याची चूक करून बसला.

श्रीलंकेने ठेवलेल्या २०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पॉवर प्ले मध्ये भारताने खराब फलंदाजी केली. सलामीवीर इशान किशन, शुबमन गिल, राहुल त्रिपाठी आणि दिपक हुड्डा यांना दोन आकडी धावसंख्या देखील करता आली नाही. त्यानंतर आलेला कर्णधार हार्दिक पांड्याला देखील मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मात्र त्यानंतर आलेल्या अक्षर पटेलने सूर्यकुमार यादवला साथ देत अर्धशतकी भागीदारी केली. त्यांच्यात ९१ धावांची भागीदारी झाली. पण सूर्या ५१ धावा करून बाद झाला. त्यानंतर अक्षर पटेलने शिवम माविच्या साथीने लक्ष्याच्या जवळ पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ३१ चेंडूत ६५ धावा करून बाद झाला आणि भारताच्या अशा संपुष्टात आल्या.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने भारतासमोर २०७ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने शानदार सुरुवात केली. यानंतर मधल्या षटकांमध्ये श्रीलंकेचा डाव गडगडला, पण शेवटी कर्णधार दासुन शनाकाने आक्रमक फलंदाजी करत संघाची धावसंख्या २०६ धावांपर्यंत नेली. श्रीलंकेकडून कुशल मेंडिस आणि दसून शनाका यांनी अर्धशतके झळकावली. भारताकडून उमरान मलिकने तीन विकेट्स घेतल्या. प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर श्रीलंकेचे सलामीवीर कुशल मेंडीस आणि पथुम निसंका यांनी वेगवान फलंदाजी केली. खास करून मेंडीसने आक्रमक रूप दाखवत अर्शदीप सिंग व शिवम मावी यांचा समाचार घेतला. या दोघांनी ८.२ षटकात ८० धावांची सलामी दिली. चहलने भारताला पहिले यश मिळवून दिले.

भारतीय फिरकी गोलंदाजांनी मधल्या षटकात विकेट्स घेत भारताला सामन्यात पुन्हा आणले होते. मात्र शिवम मावी, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक यांनी मिळून तब्बल ७ नो बॉल टाकले. त्यामुळे श्रीलंकेला खुले मैदान फटके मारण्यासाठी मिळाले. भारताकडून सर्वाधिक विकेट्स उमरान मलिकने घेतल्या. तर अक्षर पटेल आणि युजवेंद्र चहलने मिळून ३ विकेट्स घेत त्याला साथ दिली. उमरान मलिक याला एकाच षटकात तीन षटकार शनाकाने लगावले. त्यानंतर शिवम मावी व अर्शदीप सिंग यांचा देखील त्याने खरपूस समाचार घेतला.

शनाकानेअखेरपर्यंत नाबाद राहत २२ चेंडूवर ५६ धावा कुटल्या. यामध्ये दोन चौकार व सहा उत्तुंग षटकारांचा समावेश होता. त्याने आपले अर्धशतक पूर्ण करण्यासाठी केवळ २० चेंडू घेतले. भारताविरुद्ध २५० च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक झळकावणारा तो पहिला फलंदाज बनला. यापूर्वी श्रीलंकेकडून सर्वात वेगवान टी२० अर्धशतकाचा विक्रम माहेला जयवर्धने व कुमार संगकारा यांच्या नावे संयुक्तरीत्या होता. दोघांनीही २१ चेंडूंमध्ये अर्धशतके पूर्ण केलेली. तर या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी २२ चेंडूवर अर्धशतक पूर्ण करणारा कुसल परेरा आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sl 2nd t20 sri lanka beat india by 16 runs level the series 1 1 avw
Show comments