India vs Sri Lanka 3rd ODI Match: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना रविवारी (१५ जानेवारी) खेळला जात आहे. या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला. त्यामुळे यजमान संघ तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत २-० असा अजिंक्य आघाडीवर आहे. तिसरा सामना तिरुअनंतपुरम येथे खेळला जात असून या सामन्यासाठीची नाणेफेक झाली. भारताने नाणेफेक जिंकली आहे. दोन्ही संघाच्या अंतिम अकरामध्ये दोन बदल झाले आहेत.
भारताचे दोन्ही सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी शानदार फलंदाजी करत भारताला ९५ धावांची सलामी भागीदारी करून मजबूत पाया रचून दिला. रोहित आठ धावांनी त्याचे अर्धशतक करण्यापासून चुकला आणि त्याला करुणारत्नेने बाद आविष्का फर्नाडोकरवी झेलबाद केले. त्याने ४९ चेंडूत ४२ धावा केल्या. त्यात लाहिरूच्या षटकातील एका षटकाराचा समावेश आहे.
रोहितचा साथीदार शुबमन गिल अजूनही खेळपट्टीवर टिकून आहे. त्याने आणि रोहितने भारतीय डावाच्या ६व्या षटकात फिरकीपटू लाहिरू कुमाराला अक्षरशः कुटला असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही. रोहितने षटकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत आपले इरादे स्पष्ट केले होते. त्यानंतर त्याने एक धाव काढून शुबमनला फटके मारण्याची संधी दिली. त्याने देखील हे आमंत्रण स्विकारत लागोपाठ ४,४,४,४ असे ऑफसाइडला चौकार मारले. त्या षटकात भारताने २३ धावा कुटल्या. तसेच त्याचे अर्धशतक देखील पूर्ण केले असून त्याचे हे ६वे आहे. सध्या तो ५२ चेंडूत ५० धावांवर खेळत आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली १५ चेंडूत २२ धावांवर खेळत आहे.
तत्पूर्वी, भारताने आजच्या सामन्यात आपल्या संघात दोन बदल केले आहेत. नियमित कर्णधार रोहित शर्माने टी२० चा कर्णधार हार्दिक पांड्याला विश्रांती देत त्याच्या जागी टी२० चा उपकर्णधार सूर्यकुमार यादवला संघात स्थान दिले. तर वॉशिंग्टन सुंदरला उमरान मलिकच्या जागी संघात घेण्यात आले आहेत. आजचा सामना जिंकून भारतीय संघ पोंगल आणि मकरसंक्रांतीची गोड गिफ्ट देईल अशी चाहत्यांनी इच्छा व्यक्त केली आहे.