IND vs SL 3rd ODI Match Sri Lanka defeated India by 110 runs : भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत २७ वर्षांनी लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला आहे. बुधवारी झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात श्रीलंकेने भारताचा ११० धावांनी दारुण पराभव करत २७ वर्षांनी प्रथम भारताविरुद्ध वनडे मालिका जिंकली आहे. अशा प्रकारे भारतावर गौतम गंभीरच्या कोचिंग पर्वात पहिल्याच मालिकेत पराभवाची नामुष्की ओढवली आहे. गेल्या वर्षी वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दिमाखदार खेळ करत फायनल गाठणाऱ्या भारतीय संघाला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही.
वनडे मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात श्रीलंकेने भारताचा ११० धावांनी पराभव केला आहे. या विजयासह श्रीलंकेने मालिका २-० अशी खिशात घातली. दुसऱ्या सामन्यातही श्रीलंकेने भारताचा पराभव केला होता. तर पहिला एकदिवसीय सामना बरोबरीत सुटला होता. बुधवारी कोलंबोमध्ये प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने २४८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात टीम इंडिया १३८ धावांवर गडगडली. हा विजय श्रीलंकेसाठी ऐतिहासिक ठरला आहे. कारण श्रीलंकेने २७ वर्षांनंतर द्विपक्षीय वनडे मालिकेत भारताचा पराभव केला आहे. १९९७ नंतर भारताने श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे. अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेने १९९७ मध्ये भारताचा शेवटचा ३-० असा पराभव केला होता. त्यानंतर भारताने सलग ११ वेळा वनडे मालिका जिंकली होती.
टीम इंडियाची फलंदाजी खराब झाली –
श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेत भारताचे बहुतांश फलंदाज फ्लॉप ठरले आहेत. रोहित शर्माने संघाला चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला. त्याने २० चेंडूत ३५ धावा केल्या. यादरम्यान त्याने ६ चौकार आणि १ षटकार लगावला. वॉशिंग्टन सुंदर ३० धावा करून बाद झाला. शुबमन गिल ६ धावा करून बाद झाला. विराट कोहली २० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने १८ चेंडूंचा सामना केला आणि ४ चौकार मारले. ऋषभ पंत अवघ्या ६ धावा करून बाद झाला. श्रेयस अय्यर ८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. अक्षर पटेल २ धावा करून बाद झाला तर रियान पराग १५ धावा करून बाद झाला. श्रीलंकेकडून दुनिथ वेल्लालगेने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ५.१ षटकात २७ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. तिक्षाना आणि व्हँडरसे यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.
हेही वाचा – IND vs SL 3rd ODI : सिराज-मेंडिस यांच्यात लाइव्ह मॅचमध्ये जुंपली, एकमेकांना खुन्नस देतानाचा VIDEO व्हायरल
श्रीलंकेसाठी फर्नांडोची दमदार कामगिरी –
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ५० षटकांत ७ गडी गमावून २४८ धावा केल्या. यावेळी अविष्का फर्नांडोने शानदार फलंदाजी केली. त्याने १०२ चेंडूंचा सामना करत ९६ धावा केल्या. अविष्का फर्नांडोने ९ चौकार आणि २ षटकार मारले. पथुम निसांकाने ४५ धावांची खेळी साकारली. त्याने ५ चौकार आणि २ षटकार मारले आहेत. कुसल मेंडिसने ५९ धावांची खेळी केली. त्याने ४ चौकार मारले. शेवटी कामिंदू मेंडिसने नाबाद २३ धावा केल्या. समरविक्रमा शून्यावर बाद झाला. भारताकडून रियानने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ९ षटकात ५४ धावा दिल्या आणि ३ विकेट्स घेतल्या. कुलदीप यादवने १० षटकात ३६ धावा देत १ विकेट घेतली. वॉशिंग्टन सुंदर आणि मोहम्मद सिराज यांनाही १-१ विकेट मिळाली. अक्षर पटेललाही यश मिळाले.