भारत आणि श्रीलंका संघात मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच भारतीय संघाने विराट कोहलीच्या नाबाद दीड शतकाच्या जोरावर श्रीलंकेला ३९१ धावांचे लक्ष्य दिले. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने ४२ धावा केल्या. त्याचबरोबर रोहित शर्माने एक विक्रम केला आहे. ज्यामध्ये त्याने एबी डिव्हिलियर्सला मागे टाकले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा डिव्हिलियर्सच्या पुढे गेला आहे. हिटमॅन रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध त्रिवेंद्रम येथे सुरू असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ही कामगिरी केली.

रोहित शर्माने तिसऱ्या सामन्यात २४वी धाव घेताच केल्यामुळे वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या एबी डिव्हिलियर्सला मागे टाकले. डिव्हिलियर्सने वनडे क्रिकेटमध्ये ९५७७ धावा केल्या आहेत, तर रोहित शर्माने या सामन्यापूर्वी ९५५४ धावा केल्या होत्या. तिसऱ्या सामन्यादरम्यान त्याने डिव्हिलियर्सला मागे टाकले.

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा आता १७व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर या यादीत तो सहावा भारतीय आहे. या मालिकेत रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९५०० धावांचा टप्पा पार केला. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके झळकावणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे. या सामन्यात रोहित शर्माने ४९ चेंडूत ४२ धावांची खेळी केली. रोहितने या खेळीत २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४२ धावा केल्या. रोहित त्याच्या आवडत्या शॉटवर स्क्वेअर लेगला झेलबाद झाला.

सामन्याबद्ल बोलायचे तर, भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद ३९० धावा केल्या. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ११० चेंडूत नाबाद १६६ धावा केल्या. त्याचबरोबर श्रेयस अय्यरने ३८ धावांचे योगदन दिले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sl 3rd odi rohit sharma broke ab de villiers record of scoring most runs in odi cricket vbm