भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवला आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध (IND vs SL) शेवटच्या आणि निर्णायक तिसऱ्या टी-२० मध्ये धडाकेबाज शतक झळकावले. सूर्यकुमार यादवच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे तिसरे शतक आहे. राजकोटच्या मैदानावर सूर्याने ५१ चेंडूंत ७ चौकार आणि ९ षटकारांसह ११२ धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे भारतीय संघाने श्रीलंकेसमोर २२८ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले.
तिसरे शतक ४३व्या डावात झाले –
टी-२० इंटरनॅशनलमध्ये सूर्यकुमार यादव रोहित शर्मानंतर सर्वाधिक शतके करणारा भारतीय फलंदाज बनला आहे. रोहित शर्माच्या नावावर चार टी-२० आंतरराष्ट्रीय शतके आहेत. तर सूर्य त्याच्याशी बरोबरी करण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. सूर्यकुमारचे हे तिसरे टी-20 आंतरराष्ट्रीय शतक ४३ व्या डावात आले.
भारतासाठी चौथ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या –
सूर्यकुमार यादवची टी-२० इंटरनॅशनलमध्ये ११२ धावांची धावसंख्या ही भारतासाठी चौथ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे. या यादीतील विशेष बाब म्हणजे तिसरा आणि पाचवा सर्वोत्तम धावसंख्या त्याचीच आहे. त्याने २०२२ मध्ये नॉटिंगहॅममध्ये इंग्लंडविरुद्ध ११७ धावांची खेळी केली होती, तर न्यूझीलंडविरुद्ध १११ धावांची खेळी केली होती. या प्रकरणात विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. ज्याने आशिया कप २०२२ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध शानदार शतक झळकावले होते.
१२२(६१) विराट विरुद्ध अफगाणिस्तान, दुबई २०२२
११८(४३) रोहित शर्मा विरुद्ध श्रीलंका, इंदूर २०१७
११७(५५) सूर्यकुमार यादव विरुद्ध इंग्लंड, नॉटिंगहॅम २०२२
११२ (५१) सूर्यकुमार यादव विरुद्ध श्रीलंका, राजकोट २०२३
१११*(५१) सूर्यकुमार यादव विरुद्ध न्यूझीलंड, माउंट मौनगानुई २०२२
याशिवाय सुरेश रैना, दीपक हुडा आणि विराट कोहली यांनी टी-२० फॉरमॅटमध्ये शतके झळकावली आहेत. दोनपेक्षा जास्त वेळा अशी कामगिरी करणारा सूर्यकुमार यादव हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.