धर्मशाळा येथे खेळल्या गेलेल्या भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात श्रीलंकेचा खेळाडू बिनुरा फर्नांडो यांना डोळ्यांचे पारणे फेडणारा झेल घेत सर्वांना थक्क केले. फर्नांडोने भारताचा स्फोटक फलंदाज संजू सॅमसनला या झेलद्वारे चकित केले. आक्रमक अंदाजात खेळणाऱ्या सॅमसनने या सामन्यात २५ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांसह ३९ धावा केल्या.
श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरू कुमाराने १३वे षटक टाकले. या षटकात सॅमसनने २३ धावा वसूल केल्या. त्याने कुमाराला एक चौकार आणि ३ षटकार ठोकले. शेवटच्या चेंडूवर सॅमसनने स्लीपमध्ये हवेत फटका खेळला. तिथे तैनात असलेल्या फर्नांडोने हवेत उडी मारत एका हाताने हा झेल टिपला. त्याचा झेल पाहून सर्वजण स्तब्ध झाले.
हेही वाचा – IND vs SL : १००वा कसोटी सामना खेळण्याआधीच विराट कोहलीला मोठा धक्का!
या सामन्यात भारताचा कप्तान रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर फलंदाज पाथुम निसांकाचे दमदार अर्धशतक आणि कप्तान दासुन शनाकाच्या वादळी ४७ धावांच्या खेळीमुळे श्रीलंकेने २० षटकात ५ बाद १८३ धावा ठोकल्या. निसांकाने ११ चौकारांसह ७५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर शनाकाने १९ चेंडूत २ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ४७ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात भारताकडून श्रेयस अय्यर (नाबाद ७४), संजू सॅमसन (३९) आणि रवींद्र जडेजा (१८ चेंडूत नाबाद ४५) यांनी धुवांधार फलंदाजी करत श्रीलंकेचे आव्हान १७.१ षटकातच पूर्ण केले. श्रेयस अय्यरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.