India vs Sri Lanka, World Cup 2023: भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापत झाल्यापासून संघाला त्याची उणीव भासत आहे. पांड्या विश्वचषकात श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी संघात सामील होऊ शकतो, अशी माहिती भारतीय संघ व्यवस्थापनाने दिली आहे. हार्दिक पांड्या मुंबईत भारतीय संघात सामील जर झाला तर तो प्लेईंग-११मध्ये खेळणार का, हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे असणार आहे.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. तेव्हापासून त्याच्यावर उपचार सुरू असून तो दुखापतीतून सावरत आहे. विश्वचषकात अपराजित असलेल्या भारतीय संघाचा पुढील सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. या स्टेडियममध्ये २०११च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोन्ही संघ आमनेसामने आले होते, ज्यामध्ये भारताने लंकेला पराभूत करून विश्वचषक जिंकला होता. भारतीय संघ व्यवस्थापनाने सांगितले की, “होय, पांड्या, जो सध्या बंगळुरूमधील एनसीएमध्ये बरा होत आहे, तो मुंबईत संघात सामील होईल. सध्या तो श्रीलंकेविरुद्ध खेळेल की नाही हे निश्चित सांगता येत नाही, पण तो संघात सामील होईल अशी अपेक्षा आहे.”
हार्दिक पांड्या मैदानात उतरणार?
हार्दिक पांड्याचे संघात पुनरागमन होणे ही भारतासाठी आनंदाची बातमी असेल. बांगलादेशविरुद्ध गोलंदाजी करताना या अष्टपैलू खेळाडूचा पाय गोलंदाजी करताना मुरगळला होता. यानंतर तो २२ ऑक्टोबरला धरमशाला येथे झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात आणि २९ ऑक्टोबरला इंग्लंडविरुद्ध लखनऊ येथे झालेल्या सामन्यात खेळू शकला नाही. पांड्याच्या अनुपस्थितीत संघ व्यवस्थापनाने वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि फलंदाज सूर्यकुमार यादव यांचा प्लेइंग-११ मध्ये समावेश केला होता. हार्दिक पांड्याने वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत ११ धावा केल्या आहेत. दुसरीकडे, गोलंदाज म्हणून त्याने ४ सामन्यात २२.६०च्या सरासरीने ५ विकेट्स घेतल्या आहेत. मात्र, अष्टपैलू खेळाडूला फलंदाजीत फारशी संधी मिळालेली नाही.
भारत विश्वचषक २०२३ उपांत्य फेरीत कसा प्रवेश करू शकतो
आता भारताचा पुढील सामना २ नोव्हेंबरला मुंबईत श्रीलंकेशी होणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या विजयामुळे, भारत केवळ या विश्वचषकात सातवा विजय नोंदवेल असे नाही तर आयसीसी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतही अधिकृतपणे आपले स्थान निश्चित करेल. त्यानंतर केवळ दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे संघ टीम इंडियाच्या १४ गुणांची बरोबरी करू शकतील. जरी टीम इंडियाचे उर्वरित तीनही सामने पावसामुळे रद्द झाले तरी टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचेल.
हेही वाचा: PAK vs BAN: पाकिस्तानला ‘विजय’ गवसला; बांगलादेशवर सात विकेट्सनी केली मात, फखर-शफीक चमकले
२ नोव्हेंबरला श्रीलंकेचा सामना केल्यानंतर भारतीय संघ ५ नोव्हेंबरला कोलकाता येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. १२ नोव्हेंबर रोजी बंगळुरू येथे भारताचा शेवटचा साखळी सामना नेदरलँडशी होणार आहे. विश्वचषक २०२३चा पहिला उपांत्य सामना १५ नोव्हेंबरला मुंबईत आणि दुसरा उपांत्य सामना १६ नोव्हेंबरला कोलकाता येथे होणार आहे. विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे होणार आहे.