IND vs SL, Asia Cup 2023: आशिया चषकाच्या सुपर-४ फेरीतील भारतीय संघाचा दुसरा सामना श्रीलंकेशी आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करायचे आहे. त्याचबरोबर श्रीलंकेचाही हा सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा प्रयत्न असेल. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने कसून राजिथाला षटकार मारून एकदिवसीय कारकीर्दीतील १० हजार धावा पूर्ण केल्या. मात्र, त्या व्यतिरिक्त भारतासाठी एकही सकारत्मक गोष्ट घडली नाही. श्रीलंकन फिरकीपटूंसमोर भारतीय फलंदाजांनी अक्षरशः लोटांगण घातलं. रोहित शर्मा, इशान किशन आणि के. एल. राहुल वगळता एकही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही. २० वर्षीय दुनिथ वेलालागेने टीम इंडियाच्या फलंदाजीला भगदाड पाडले.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यात टीम इंडियाने पहिल्या डावात सर्वबाद २१३ धावा केल्या. भारताची सुरुवात शानदार झाली. पहिल्या विकेटसाठी रोहित आणि शुबमनने ८० धावांची भक्कम अशी भागीदारी केली. मात्र, त्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुबमन गिल हे सुरुवातीचे तिन्ही प्रमुख फलंदाज झटपट बाद झाले.
रोहितने ४८ चेंडूत ५३ धावा केल्या, त्यात त्याने ७ चौकार आणि २ षटकार मारले. पाकिस्तान सामन्यातील स्टार शतकवीर विराट कोहली आणि के. एल. राहुल या दोघांनी अनुक्रमे ३ आणि ३९ धावा केल्या. शुबमन गिलने २५ चेंडूत १९ तर इशान किशनने ६१ चेंडूत ३३ धावा केल्या. के.एल. राहुल आणि इशान किशन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला त्या दरम्यान त्यांनी ६३ धावांची दमदार अर्धशतकी भागीदारी केली. यांच्या व्यतिरिक्त एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही.
२० वर्षीय २० वर्षीय दुनिथ वेलालागेने भेदक गोलंदाजी करत १० षटकात ४० धावा देत ५ विकेट्स घेतल्या. त्याच्या फिरकीने सर्वांनाच प्रभावित केले. त्याला चरित असलंकाने ४ विकेट्स घेत उत्तम साथ दिली. या दोघांनी भारतीय फलंदाजांना त्याच्या फिरकीवर अक्षरशः नाचवले असे म्हटले तर वावगं ठरणार नाही.
काही काळ पावसामुळे खेळ थांबला होता
४७ षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या १९७/९ असताना पावसाने एन्ट्री घेतली. तब्बल एक तासानंतर पुन्हा खेळाला सुरुवात झाली. अक्षर पटेलने ३६ चेंडूत २६ धावा आणि मोहम्मद सिराजने १९ चेंडूत ५ धावा करून नाबाद राहिला. या सामन्यात श्रीलंकेच्या फिरकीपटूंसमोर भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्करली. टीम इंडियाने श्रीलंकेसमोर २१४ धावांचे आव्हान ठेवले आहे. भारतीय फिरकीपटू हे लक्ष्य वाचवण्यात यशस्वी होतात का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.