भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनला श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात फलंदाजी करताना दुखापत झाली. लंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरू कुमाराचा चेंडू खेळताना इशान डोक्याला दुखापत झाली. प्रतितास १४४ किमी वेगाने आलेला हा चेंडू बाऊन्सर होता.
यानंतर फिजिओला मैदानात यावे लागले, तपासाअंती इशान किशन बरा असल्याचे निष्पन्न झाले आणि त्याने फलंदाजीला सुरुवात केली, मात्र सहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याने विकेट गमावली. यादरम्यान त्याने १६ धावा केल्या. मात्र, नंतर इशानला रुग्णालयात नेण्यात आले. कांगडा येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये इशानला आयसीयू वॉर्डात दाखल केल्यानंतर त्याचे स्कॅनही करण्यात आले. यानंतर त्याला जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले.
हेही वाचा – VIDEO : मिशीवाला माही..! IPL 2022पूर्वी महेंद्रसिंह धोनीचा ‘रावडी’ लूक झाला व्हायरल
आता समोर आलेल्या वृत्तानुसार, इशान किशनला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याला अजूनही डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. अशा स्थितीत तिसऱ्या टी-२० सामन्यात त्याचे खेळणे संशयास्पद मानले जात आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाने सुसाट वेग धारण करत आपला विजयीरथ पुढे हाकला आहे. वेस्ट इंडीजनंतर भारताने श्रीलंकाविरुद्धची टी-२० मालिकाही जिंकली आहे. धर्मशाला येथे खेळला गेलेला दुसरा टी-२० सामना भारताने ७ गडी राखून जिंकला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. या सामन्यात भारताचा कप्तान रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
सलामीवीर फलंदाज पाथुम निसांकाचे दमदार अर्धशतक आणि कप्तान दासुन शनाकाच्या वादळी ४७ धावांच्या खेळीमुळे श्रीलंकेने २० षटकात ५ बाद १८३ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात भारताकडून श्रेयस अय्यर (नाबाद ७४), संजू सॅमसन (३९) आणि रवींद्र जडेजा (१८ चेंडूत नाबाद ४५) यांनी धुवांधार फलंदाजी करत श्रीलंकेचे आव्हान १७.१ षटकातच पूर्ण केले. श्रेयस अय्यरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.