Kuldeep Yadav on IND vs SL, Asia Cup 2023: भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात भारतीय फिरकीपटू कुलदीप यादवने जबरदस्त गोलंदाजी केली. आशिया कपमध्ये कुलदीप सातत्याने चमकदार कामगिरी करत आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाच विकेट्स घेणाऱ्या या गोलंदाजाने सलग दुसऱ्या दिवशी चार विकेट्स घेत स्वत:ला सिद्ध केले. श्रीलंकेसोबतच्या सामन्यात, कुलदीप विकेटकीपर के.एल. राहुलशी षटकादरम्यान संवाद साधताना दिसला, त्यानंतर लगेचच कुलदीपने त्याची पुढची विकेट घेतली. के.एल.ने दिलेल्या सल्ल्याबद्दल फिरकीपटूने सांगितले आहे.
कुलदीप आणि सूर्यकुमार यादव यांनी एकमेकांची मुलाखत घेतली त्याचा व्हिडीओ बीसीसीआयच्या ट्वीटर हॅण्डलवर शेअर केला आहे. सामन्यानंतर बीसीसीआय असे मुलाखतीचे व्हिडीओ शेअर करत असते. व्हिडीओमध्ये सूर्यकुमारने कुलदीपला के.एल. राहुलने दिलेल्या सल्ल्याबद्दल विचारले, “तू विकेट घेतली आणि लोकेश राहुल किंवा कर्णधाराकडे बोट दाखवले, त्यामागची योजना नेमकी काय होती?”
सूर्यकुमारच्या या प्रश्नावर कुलदीपने उत्तर दिले. तो म्हणाला की, “के.एल. भाईचा एक सल्ला होता की जेव्हा चेंडू इतका फिरत असेल तेव्हा तो ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर ठेव. चेंडूचा टप्पा जर ऑफ स्टंपच्या बाहेर असले तर फलंदाज आणखी अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे यावेळी मी चौथ्या-पाचव्या स्टंपमधून चेंडू वळवायला सुरुवात केली आणि आमचा तो प्लॅन यशस्वी झाला.” कुलदीपने पुढे सांगितले की, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शादाबला बाद करण्यासाठी त्याने एक दिवस आधी हीच योजना आखली होती.
‘जेव्हा तुम्ही भारतासाठी खेळता तेव्हा तुम्हाला प्रेरणा मिळते‘– कुलदीप यादव
या दिवसांमध्ये भारतीय संघ सलग तीन दिवस क्रिकेट खेळला आहे. पावसामुळे पाकिस्तानविरुद्धचा सामना राखीव दिवशी हलवण्यात आला, त्यामुळे सामना दोन दिवसांत पूर्ण झाला. यानंतर याच मैदानावर भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना झाला. अशा स्थितीत भारतीय खेळाडूंना अतिरिक्त प्रयत्न दाखवावे लागले. सूर्यकुमारने कुलदीपला विचारले की, “तो अशा परिस्थितीसाठी कशी तयारी करतो.”
कुलदीपने सांगितले की, “काल पाकिस्तानविरुद्ध गोलंदाजी अफलातून होती, मी संपूर्ण दहा षटके टाकली, पण मला लय सापडायला थोडा उशीर झाला. नंतर मग एकदा लय मिळाली की चेंडू आपोआप योग्य ठिकाणी पडतो. मी पाकिस्तानविरुद्धचा रात्री सामना झाल्यानंतर शांत झोपलो आणि सकाळी लवकर उठलो. त्यानंतर व्यवस्थित नाश्ता केला. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहाला उठायचं होतं पण त्याआधीच जग आली. जेव्हा तुम्ही भारतासाठी खेळता तेव्हा तुम्ही प्रेरित राहता आणि हेच माझ्या बाबतीत घडत आहे.”