नववर्षात भारतीय क्रिकेट संघ आपल्या मोहिमेची सुरुवात मंगळवारी (३ जानेवारी) करेल. भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत सहभागी होईल. ताज्या दमाच्या भारतीय संघाकडून सर्वांना मोठ्या अपेक्षा आहेत. या मालिकेत हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करत आहे, तर स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आता भारताचा माजी दिग्गज फलंदाज गौतम गंभीरचे सूर्यकुमारबाबत वक्तव्य आले आहे. गंभीर म्हणाला की, “याकडे आता फारशी लक्ष देण्याची गरज नाही. रोहितच्या संघाच्या आगमनानंतर काय होईल, याची प्रतीक्षा करावी लागेल.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूर्यकुमारच्या कर्णधारपदावर गौतम गंभीर काय म्हणाला?

गौतम गंभीरने स्टार स्पोर्टशी संवाद साधताना सांगितले की, “मला वाटत नाही की सगळ्यांना याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. कारण, रोहित टी२० संघात आल्यानंतर आम्हाला प्रतीक्षा करावी लागेल आणि तो अजूनही कर्णधार म्हणून आहे. ज्यादिवशी तो कायमस्वरूपी त्यावरून जाईल त्यावेळेस यावर आपण सविस्तर बोलू शकतो. तोपर्यंत हार्दिक आणि सूर्या उपकर्णधार म्हणून पुढे चालू ठेवा असा माझा त्यांना सल्ला असेल.” गौतम गंभीरच्या बोलण्यातून हे स्पष्ट होत आहे की, रोहितने टी२० चे कर्णधारपद स्वीकारल्यानंतर कदाचित हार्दिकला टी२० कर्णधारपद सोडावे लागेल. त्याचवेळी, केएल राहुलने उपकर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारताच सूर्यकुमारला आपले पद सोडावे लागू शकते.

हेही वाचा: “कठीण काळात ज्यावेळेस मी दुखापतग्रस्त होतो…” आयपीएल २०२३ मधील सर्वात महागड्या अनकॅप्ड खेळाडूने राहुल द्रविडबाबत केले मोठे भाष्य

सूर्यकुमार यादव सर्व फॉरमॅट खेळू शकतो

गौतम गंभीर म्हणाला, “मला वाटते की सूर्या हा एक असा खेळाडू आहे ज्याने हे दाखवून दिले की तुम्ही टी२० फॉरमॅटचा खेळाडू होऊ शकता आणि टी२० मधून तुम्ही एक एकदिवसीय खेळू शकता आणि नंतर कदाचित कसोटी सामन्यांची तयारी सुद्धा करू शकता.” तो खऱ्या अर्थाने आयपीएल प्रोडक्ट आहे असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. आयपीएलमुळे अशा अनेक खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली आहे. भारतीय क्रिकेटला आयपीएल ही खूप मोठी देन आहे. पुढे गौतम म्हणाला, “आता त्याच्यावर नेतृत्वाचा विश्वास आहे आणि देशाचा उपकर्णधार होणे हा नेहमीच मोठा सन्मान आहे. त्यामुळे तो चांगलं काम करेल याची मला खात्री आहे. जरी रोहित शर्मा आला आणि निवडकर्त्यांना वाटत असेल की हार्दिक योग्य व्यक्ती आहे आणि सूर्या उपकर्णधार आहे, तरीही आपण बदल करू शकत नाही.”

हेही वाचा: India vs Sri Lanka : भारत विरुद्ध श्रीलंका पहिला ट्वेन्टी-२० सामना कधी? कुठं मोफत पाहता येणार

युजवेंद्र चहलकडे लागलेल्या आहेत सर्वांच्या नजरा

चहलकडे या मालिकेत भारताचा सर्वात यशस्वी टी२० गोलंदाज होण्याची संधी असेल. मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर या मालिकेला सुरुवात होईल. भारतीय संघाचे नेतृत्व अष्टपैलू हार्दिक पंड्या याच्याकडे आहे. या संघात सर्वात अनुभवी गोलंदाज म्हणून फिरकीपटू युजवेंद्र चहल सहभागी होईल. त्याच्याकडे या सामन्यात चार बळी घेतल्यास भारतात सर्वात यशस्वी टी२० गोलंदाज होण्याची संधी असेल. चहलने आतापर्यंत भारतीय संघासाठी ७१ टी२० सामने खेळताना ८७ बळी टिपले आहेत. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा ९० बळींसह सध्या या यादीत अव्वलस्थानी आहे. चहल या मालिकेतील सर्व सामने खेळण्याची शक्यता असल्याने, तो हा विक्रम आपल्या नावे करू शकतो.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sl let rohit come then indias 360 degrees gautam gambhir makes important statement on suryakumars vice captaincy avw