Rohit Sharma Ten thousand runs in ODI cricket: आशिया चषकाच्या सुपर-४ फेरीतील भारतीय संघाचा दुसरा सामना श्रीलंकेशी आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करायचे आहे. त्याचबरोबर श्रीलंकेचाही हा सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा प्रयत्न असेल. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने कसून राजिथाला षटकार मारून एकदिवसीय कारकीर्दीतील १० हजार धावा पूर्ण केल्या.
भारतीय कर्णधार रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात वन डे क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो सहावा भारतीय फलंदाज ठरला. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांनी ही कामगिरी केली आहे. रोहितने आतापर्यंत २४१ एकदिवसीय सामन्यातील २०५ डावात ४८.९१च्या सरासरीने आणि ९०.१९च्या स्ट्राईक रेटने १०.००० धावा पूर्ण केल्या आहेत. या काळात त्याने आपल्या बॅटने विरोधी संघातील गोलंदाजांना धू-धू धुतले आहे. त्यात त्याने ३० शतके आणि ५० अर्धशतके झळकावली आहेत. त्यात त्याने तीन वेळा द्विशतक देखील ठोकले आहे. त्याची सर्वोतम धावसंख्या देखील श्रीलंकेविरुद्ध २६४ एवढी आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रोहितला फक्त २२ धावा करायच्या होत्या आणि त्याने हा पराक्रम सहज केला. आशिया कपमध्ये भारताचा शेवटचा सामना पाकिस्तानसोबत होता. या सामन्यात विराट कोहलीने नाबाद १२२ धावा केल्या आणि वन डे क्रिकेटमधील १३ हजार धावा पूर्ण केल्या. आता रोहित शर्मा १० हजार धावा पूर्ण करणारा सहावा खेळाडू झाला आहे. रोहितने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात उत्कृष्ट अर्धशतक झळकावले होते. यासह त्याने वन डेत अर्धशतक पूर्ण केले. आता त्याच्या नावावर आणखी एक यश आहे.
वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय
खेळाडू | धावा | सरासरी | डाव | शतके | अर्धशतके |
सचिन तेंडुलकर | १८,४२६ | ४४.८३ | ४५२ | ४९ | ९६ |
विराट कोहली | १३,०२४ | ५७.६२ | २६७ | ४७ | ६५ |
सौरव गांगुली | ११,२२१ | ४०.९५ | २९७ | २२ | ७१ |
राहुल द्रविड | १०,७६८ | ३९.१५ | ३१४ | १२ | ८२ |
महेंद्र सिंह धोनी | १०,५९९ | ५०.२३ | २९४ | ९ | ७३ |
रोहित शर्मा | १०,०००* | ४८.९१ | २४० | ३० | ५० |
कोलंबो हवामान
सामन्याच्या दिवशी पाऊस पडण्याची ९० टक्के शक्यता आहे, त्यामुळे नक्कीच पाऊस पडेल आणि खेळ खराब होईल असे समजा. कोलंबोच्या मैदानात ड्रेनेजची चांगली व्यवस्था आहे, पण पाणी तुंबत राहिल्यास आयोजक हतबल होतील. खेळाडू आणि चाहत्यांसाठी ही परिस्थिती चांगली नाही. मात्र, सध्या तरी कडक ऊन पडलं आहे असून सामना सुरु आहे.
दोन्ही संघांची प्लेईंग ११
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
श्रीलंका: पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेलालागे, महिश तिक्षाना, कसुन राजिथा, मथिशा पाथिराना.