श्रीलंकेविरुद्ध ३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. या भारतीय संघातून यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला वगळण्यात आले आहे. त्याला टी-२० आणि एकदिवसीय मालिकेतून वगळण्यात आले आहे. पंतने नुकतेच बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ९३ धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याला संघातून वगळल्याने चाहते चकीत झाले आहेत. एकदिवसीय आणि टी-२० मधील खराब कामगिरीमुळे त्याला वगळण्यात आल्याचे पंतच्या टीकाकारांचे म्हणणे आहे, तर अधिकृतपणे याबाबत काहीही सांगितले गेलेले नाही.
श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी इशान किशन आणि संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर एकदिवसीय मालिकेसाठी केएल राहुल आणि ईशान यांची यष्टिरक्षक फलंदाज म्हणून निवड केली आहे. पंतला मालिकेतून वगळण्यात आल्याबद्दल क्रिकेट चाहते विविध अंदाज लावत आहेत. पण पीटीआयच्या वृत्तानुसार, वेगळीच गोष्ट समोर आली आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, पंत जखमी झाला आहे. त्याला गुडघ्याच्या समस्येने ग्रासले असून त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडे (NCA) रिपोर्ट करण्यास सांगितले आहे. उपचारांसाठी तो सुमारे दोन आठवडे एनसीएमध्ये जाणार आहे. मात्र, बीसीसीआयच्या निवेदनात याचा उल्लेख नाही.
विशेष म्हणजे, पंतने २०१७ मध्ये त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने आतापर्यंत ३३ कसोटी, ३० एकदिवसीय आणि ६६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेत. ज्यामध्ये अनुक्रमे २२७१, ८६५ आणि ९८७ धावा केल्या आहेत. पंतने लांबलचक फॉर्मेटमध्ये ज्या प्रकारची छाप पाडली होती, ती मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये त्याला पाडता आली नाही. कसोटीत त्याची सरासरी ४३.६७, वनडेत ३४.६० आणि टी-२० मध्ये २२.४३ आहे. पंतने कसोटीत ५ शतके आणि ११ अर्धशतके केली आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने १ शतक आणि ५ अर्धशतके झळकावली आहेत. पंतने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये केवळ ३ अर्धशतके झळकावली आहेत.
टी-२० मालिकेसाठी संघ:
हार्दिक पांड्या (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, यजुर्वेद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.
हेही वाचा – ट्वेन्टी-२० मालिकेसाठी हार्दिक पंडय़ा कर्णधार
एकदिवसीय मालिकेसाठी संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, यजुर्वेद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.