India vs Sri Lanka T20I Series: भारत आणि श्रीलंका यांच्यात ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. या (IND vs SL) मालिकेसाठी भारतीय संघ श्रीलंकेत पोहोचला आहे. टी-२० मालिकेतील पहिला सामना २७ जुलै रोजी होणार आहे, त्याआधी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने संघाची घोषणा केली आहे. इतकंच नाही तर वानिंदू हसरंगानं कर्णधारपद सोडल्यानंतर या मालिकेसाठी नवा कर्णधार कोण असेल याचीही घोषणा केली आहे.
IND vs SL: कोण आहे श्रीलंकेचा नवा कर्णधार?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिला सामना २७ जुलै रोजी होणार आहे. यासाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ श्रीलंकेत पोहोचला आहे. दरम्यान, आता श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आपला संघ जाहीर केला आहे. तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी चरिथ असलंकाला नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. माजी कर्णधार दासून शनाका आणि वानिंदू हसरंगा यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. बोर्डाने संघात फारसे बदल केलेले नाहीत, मात्र अनुभवी आणि युवा खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न नक्कीच आहे. संघाचा माजी कर्णधार आणि अफाट अनुभव असलेला खेळाडू अँजेलो मॅथ्यूजला स्थान देण्यात आलेले नाही. मात्र, यामागचे कारण काय, हे स्पष्ट झालेले नाही.
चरिथ असलंका २०२४ च्या टी२० विश्वचषकात संघाचा उपकर्णधार होता. वानिंदू हसरंगाने कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर तो संघाचा नवा कर्णधार होऊ शकतो, अशी चर्चा होती. आता श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्याची अधिकृत घोषणा केली आहे. विशेष बाब म्हणजे चरिथ असलंकाच्या नेतृत्वाखाली जाफना किंग्जने अलीकडेच लंका प्रीमियर लीग म्हणजेच LPL चे विजेतेपद पटकावले होते, त्यानंतर तो कर्णधार होण्याची शक्यता अधिक वाढली होती.
टी-२० मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ :
चरिथ असलंका (कर्णधार), पाथुम निसांका, कुसल परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चंडिमल, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेल्लालगे, महेश थेक्साना, विइक्शाना, विइक्शाना, विक्शना, नुनिथ वेल्लालगे, चरिथ नुसिंग, विष्णुमास तुषारा, दुष्मंथा चमीरा, बिनुरा फर्नांडो.
© IE Online Media Services (P) Ltd