Sanju Samson Instagram Post: भारत आणि श्रीलंका संघाच तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकला आहे. दुसरा सामना आज पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दरम्यान पहिल्या सामन्यानंतर भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन बाहेर पडला आहे. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने उर्वरित दोन सामन्यांना मुकला आहे. अशात संजू सॅमसनने एक इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना पुनरागमनाचे संकेत दिले आहेत.
गुरुवारी सॅमसनने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, “ऑल इज वेल… लवकरच भेटू.” सॅमसनच्या पोस्टवरून त्याची दुखापत फारशी गंभीर नसल्याचे समजते. त्याचबरोबर तो लवकरच पुनरागमन करू शकेल, याचा अंदाज लावता येतो.
दुसरीकडे, बीसीसीआयने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन श्रीलंकेविरुद्धच्या उर्वरित टी-२० सामन्यांमधून बाहेर पडला आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात, क्षेत्ररक्षण करताना त्याला दुखापत झाली होती. सॅमसनच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे.”
हेही वाचा – MAH vs ASM: रणजी ट्रॉफीमध्ये केदार जाधवचा धुमाकूळ; आसामच्या गोलंदाजांना घाम फोडत झळकावले द्विशतक
बोर्डाने आपल्या निवेदनात पुढे म्हटले, ”बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली सॅमसनचे स्कॅनिंग करण्यात आले आहे. त्याला विश्रांती आणि रिहॅबिलिटेशनचा सल्ला देण्यात आला आहे.”
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात संजू सॅमसनला संधी मिळाली होती. परंतु या सामन्यात त्याला आपल्या फलंदाजीने छाप पाडता आली नाही. तो पहिल्या सामन्यात अवघ्या ५ धावा काढून तंबूत परतला होता. आता त्याच्या जागी भारतीय संघात जितेश शर्माची निवड करण्यात आली आहे.