भारत आणि श्रीलंका नवीन वर्षाची सुरुवात एकमेकांविरुद्ध खेळून करतील. या दोन्ही संघांत टी-२० मालिकेतील पहिला सामना आज वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे.भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेत श्रीलंकन संघासाठी चांगली गोष्ट म्हणजे त्यांना रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह यासारख्या खेळाडूंचा सामना करावा लागणार नाही. पाहुण्या संघाचा कर्णधार दासुन शनाकाकडे रोहित शर्माला एका विक्रमात मागे टाकण्याची नामी संधी आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण २९ टी-२० सामने झाले आहेत. ज्यामध्ये भारतीय संघाचा वरचष्मा राहिला आहे. दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत एकूण ९ टी-२० मालिका खेळल्या गेल्या आहेत. श्रीलंकेने आजपर्यंत भारतात एकही टी-२० मालिका जिंकलेली नाही, तर एकूण श्रीलंकेला भारताविरुद्ध फक्त एकदाच टी-२० मालिका जिंकण्यात यश आले आहे. ७ वेळा भारत, १ वेळा श्रीलंका आणि १ वेळा मालिका अनिर्णित राहिली.
आज संध्याकाळी होणाऱ्या सामन्यात रोहित शर्माला, सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत मागे टाकून पहिल्या क्रमांकावर येण्याची संधी शनाकाकडे असेल. या दोन संघांमध्ये टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे, मात्र या मालिकेत हा विक्रम मोडला जाऊ शकतो. श्रीलंका संघाचा कर्णधार दासुन शनाका विक्रम मोडून पहिल्या क्रमांकावर येण्याच्या जवळ आहे.
सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू –
रोहित शर्मा श्रीलंका संघाविरुद्ध टी-२० मालिका खेळणार नाही, तो एकदिवसीय मालिकेत कर्णधार असेल. रोहितच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची कमान हार्दिक पांड्याकडे आहे. सध्या रोहित शर्मा भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. रोहितने १९ सामन्यांच्या १७ डावात एकूण ४११ धावा केल्या आहेत. रोहितने १ शतक आणि १ अर्धशतक झळकवले आहे.
या यादीत शिखर धवन दुसऱ्या क्रमांकावर आणि विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे, मात्र हे दोघेही या मालिकेत खेळत नाहीत. दासुन शनाका या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे, त्याला रोहितला मागे टाकून नंबर वन होण्याची संधी आहे.
हेही वाचा – Saurashtra vs Delhi: रणजी ट्रॉफीत जयदेव उनाडकटने रचला इतिहास, ‘हा’ विक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू
दासून शनाकाकडे सुवर्णसंधी –
शनाकाने १९ सामन्यांच्या १७ डावात ३०६ धावा केल्या आहेत. त्याने एक शतक आणि एक अर्धशतकी खेळीही खेळली आहे. शनाकाला १०६ धावांची गरज आहे. या धावा केल्यानंतर तो रोहितला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर येईल. शनाकाला ३ डावात १०६ धावांची गरज असून, या मालिकेत रोहितला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर येण्याची सुवर्णसंधी त्याच्याकडे असेल