India vs Sri Lanka, Asia Cup 2023: भारत आणि श्रीलंका आशिया चषकातील तिसऱ्या सुपर-४ सामन्यात टीम इंडियाने ४१ धावांनी रोमहर्षक विजय नोंदवला. सलग १३ वन डे नंतर श्रीलंकेचा विजयरथ रोखत त्यांचा पराभव केला. या विजयासह भारतीय संघ आशिया चषक २०२३च्या फायनलमध्ये पोहचला आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत श्रीलंकेला १७२ धावांवर सर्वबाद केले. कुलदीप यादवने या सामन्यात अफलातून कामगिरी केली. फलंदाजीत कर्णधार रोहित शर्माने शानदार अर्धशतक झळकावले. दुनिथ वेलालगेने भारतीय संघाने गोलंदाजी आणि फलंदाजीत झुंजवले, त्याला सामनावीराचा पुरस्कार दिला.
भारताने श्रीलंकेचा ४१ धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने आशिया कप २०२३च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने ४९.१ षटकात २१३ धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ ४१.३ षटकांत १७२ धावांवर गारद झाला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ५३ धावा केल्या. राहुलने ३९ आणि किशनने ३३ धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून दुनिथ वेलालगेने पाच आणि चरिथ असलंकाने चार विकेट्स घेतल्या. श्रीलंकेच्या डावात ड्युनिथ वेलालगेने सर्वाधिक ४२* धावा केल्या. धनंजय डी सिल्वाने ४१ धावांचे योगदान दिले. भारताकडून कुलदीप यादवने चार विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी दोन बळी घेतले.
भारताच्या डावात काय घडले?
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टी पाहता शार्दुल ठाकूरच्या जागी टीम इंडियाने अक्षर पटेलला संधी दिली. रोहित आणि गिलच्या जोडीने पुन्हा एकदा दमदार सुरुवात केली. दोघांनी मिळून पॉवरप्लेमध्ये ६५ धावा जोडल्या. रोहित आणि गिल यांच्यात ११.१ षटकात पहिल्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी केली .
गिलला क्लीन बॉलिंग करून ड्युनित वेलल्गेने ही भागीदारी तोडली. पुढच्याच षटकात त्याने विराट कोहलीलाही तीन धावांवर बाद केले आणि आपल्या तिसऱ्या षटकात वेलल्गेनेही रोहितला बोल्ड केले आणि टीम इंडिया अडचणीत आली. बाद होण्यापूर्वी रोहितने ४८ चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या. आशिया चषक स्पर्धेत त्याने सलग तिसऱ्या डावात अर्धशतक झळकावले आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०,००० धावाही पूर्ण केल्या. हे त्याचे वन डेतील ५१वे अर्धशतक होते.
भारताच्या ९१ धावांवर तीन विकेट्स पडल्यानंतर इशान किशन आणि लोकेश राहुलने डावाची धुरा सांभाळली. दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली आणि टीम इंडियाची धावसंख्या १५० धावांच्या पुढे गेली. ३९ धावांवर लोकेश राहुलला बाद करत वेललगेने भारताला चौथा धक्का दिला. काही वेळाने इशान किशनही ६१ चेंडूत ३३ धावांची झुंजार खेळी करत चरित असलंकाचा बळी ठरला. पुढचे षटक वेलाल्गेच्या स्पेलचे शेवटचे षटक होते आणि त्याने शेवटच्या चेंडूवर ५ धावांवर हार्दिक पांड्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. वेललागेने प्रथमच एकदिवसीय सामन्यात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.
रवींद्र जडेजाही १९ चेंडूत ४ धावा काढून असलंकाचा बळी ठरला. त्यानंतर पाच धावांवर असलंकाने बुमराहला बोल्ड केले. पुढच्याच चेंडूवर कुलदीपही खाते न उघडताच बाद झाला. भारताने १८६ धावांत नऊ विकेट्स गमावल्या होत्या. अशा स्थितीत सिराज आणि अक्षर यांनी शेवटच्या विकेटसाठी २७ धावांची भागीदारी केली आणि भारताची धावसंख्या २१३ धावांपर्यंत नेली. मात्र, टीम इंडियाला या स्पर्धेत दुसऱ्यांदा पूर्ण ५० षटकेही खेळता आली नाहीत आणि ४९.१ षटकांत २१३ धावा केल्या. वेलालगेच्या पाच विकेट्स व्यतिरिक्त श्रीलंकेकडून चारिथ असलंकाने चार विकेट्स घेतल्या. महेश तिक्षणा एक विकेट मिळाली. या डावात सर्व विकेट्स फिरकी गोलंदाजांनी घेतल्या.