भारत आणि श्रीलंका संघांतील वनडे मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना रविवारी पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने विराट कोहलीच्या (१६६*) आणि शुबमन गिलच्या (११६) शतकाच्या जोरावर ३९० धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ ७३ धावांवर आटोपला. त्यामुळे भारतीय संघाने ३१७ धावांनी विजय मिळवताना मालिका देखील ३-० ने खिश्यात घातली. यानंतर शुबमन गिल आणि विराट कोहलीने आपल्या यशाचे श्रेय तीन साथीदारांना दिले, ज्याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला.
जेव्हा आपण खेळाडूंना मैदानावर कामगिरी करताना पाहतो, तेव्हा त्यामागे त्यांची मेहनत पाहायला मिळते. पण खेळाडूंची ही मेहनत कशामुळे यशस्वी होते, यावर आपण कधीच बोलत नाही. वास्तविक, खेळाडूंना सरावात मदत करण्यासाठी संघात अनेक सदस्य असतात, जे त्यांच्या खेळाडूंच्या मेहनतीला सतत साथ देतात. रविवारी सामन्यानंतर, विराट आणि शुबमनने पडद्याआड राहून खेळाडूंना मोठ्या स्थानावर पोहोचवणाऱ्या टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफचा चेहरा जगाला दाखवला.
बीसीसीआयने आपल्या अधिकृत वेबसाइटवर शुबमन गिल आणि विराट कोहलीच्या मुलाखतीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये कोहली आणि गिल यांनी त्यांच्या सपोर्ट स्टाफचीही ओळख करून दिली. या मुलाखतीत कोहली आणि गिल यांच्यासह नोव्हान, दया आणि रघु उपस्थित होते.
या सपोर्ट स्टाफची ओळख करून देताना विराट कोहली म्हणाला, ”खरं सांगायचं तर नोव्हान, दया आणि रघू यांनी आम्हाला दररोज जागतिक दर्जाचा सराव करण्यास मदत केली आहे. ते आम्हाला नेटमध्ये आव्हान देतात आणि सांगतात की, 150KMPH वेगाने येणाऱ्या चेंडूचा सामना कसा करायचा? ते नेहमी आम्हाला बाद करतात आणि आमची परीक्षा घेत असतात.”
हेही वाचा – IND vs SL: विराटला भेटण्यासाठी चाहता मैदानात घुसला अन्… सुरक्षा कर्मचारी आणि खेळाडू पाहतच राहिले; पाहा VIDEO
विराट पुढे म्हणाला, ”खरे सांगायचे तर माझ्या या कारकिर्दीत सर्वात मोठा फरक यांच्यामुळे आहे. या सरावाच्या आधी मी जो क्रिकेटपटू होतो आणि आज मी जिथे आहे, त्याचे सर्वाधिक श्रेय त्यांना जाते. ज्यांनी आम्हाला दररोज सराव करायला लावला. मला वाटतं शुबमनला पण तसंच वाटत असावं. त्यांचे योगदान अतुलनीय आहे. आमच्या यशामागे त्यांचा हात आहे. म्हणून तुम्ही त्यांचे चेहरे आणि नावे लक्षात ठेवा.”
तसेच शुबमन गिल म्हणाला, ”खरं तर मला वाटतं या तिघांनी मिळून १२०० ते १५०० विकेट्स आरामात घेतल्या असत्या. तिघेही खूप मेहनत घेतात आणि सामन्याच्या तयारीसाठी आम्हाला खूप मदत करतात.”
हेही वाचा – IND vs SL 3rd ODI: विराटने पुल शॉटवर खणखणीत षटकार लगावतचा हिटमॅनने केले अभिनंदन, पाहा VIDEO
यादरम्यान विराट कोहलीने आपल्या खेळी आणि फॉर्मबद्दलही सांगितले. विश्वचषक वर्षाच्या अशा सुरुवातीमुळे खूप आनंदी असल्याचे कोहली म्हणाला. श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेत कोहलीने दोन शतके झळकावली आणि त्याला मालिकावीर पुरस्कारासह सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. कोहली म्हणाला, की मला माहित आहे की मी सातत्य राखतो, जेव्हा मी अशी सुरुवात करतो आणि मला आत्मविश्वास मिळतो. तेव्हा गोष्टी चांगल्या होतात. अशा प्रकारे वर्षाची सुरुवात करताना मला खूप आनंद होत आहे.