IND vs SL Asia Cup 2023: आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव करत आठव्यांदा विजेतेपद पटकावले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा डाव १५.२ षटकांत ५० धावांवर आटोपला. मोहम्मद सिराजने सहा विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात भारताने हा सामना ६.१ षटकांत म्हणजे अवघ्या ३७ चेंडूत जिंकला. शुबमन गिल १९ चेंडूत २७ धावा करून नाबाद राहिला आणि इशान किशन १८ चेंडूत २३ धावा करून नाबाद राहिला. फलंदाजी करताना सलामीवीरांनी विकेट टिकवून ठेवल्यामुळे संघाला मोठा विजय मिळाला. सामना संपल्यानंतर इशान किशन याने रोहितचे आभार मानले.
आशिया कप २०२३चे विजेतेपद टीम इंडियाने मिळवले. आज स्पर्धेचा अंतिम सामना खेळला गेला, जो भारताने १० विकेट्सने नावावर केला. मोहम्मद सिराज भारतासाठी मॅच विनर ठरला. भारताने फलंदाजी करताना सलामीवीरांनी विकेट टिकवून ठेवल्यामुळे संघाला मोठा विजय मिळाला. सामना संपल्यानंतर इशान किशन याने कर्णधार रोहित शर्माचे आभार मानले. मात्र, त्याने आभार मानताना मोठे भाष्य केले.
एकदिवसीय अंतिम फेरीतील चेंडूंच्या बाबतीत सर्वात मोठा विजय
भारताने कोणत्याही एकदिवसीय क्रिकेट फॉरमॅट फायनलमध्ये शिल्लक चेंडूंच्या बाबतीत सर्वात मोठा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने आशिया कपच्या फायनलमध्ये २६३ चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. २००३ मध्ये सिडनी येथे झालेल्या तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात त्याने इंग्लंडविरुद्ध २२६ चेंडू राखून सामना जिंकला होता.
कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियाचा नियमित सलामीवीर फलंदाज आहे पण आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात त्याने डावाची सुरुवात केली नाही. शुबमन गिल आणि त्याची साथ देण्यासाठी हिटमॅनच्या जागी डावखुरा फलंदाज इशान किशन फलंदाजीला आला. इशानने २३ आणि गिलने २७ धावा करत भारताला मिळालेले ५१ धावांचे लक्ष्य अवघ्या ६.१ षटकात गाठले. विजयानंतर स्वतः रोहितनेच आपल्याला डावाची सुरुवात करण्याची संधी दिली, असा खुलासा इशानकडून केला गेला.
भारतीय संघाच्या इतिहासात हा आठवा आशिया चषक विजय ठरला. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात हा सलग दुसरा आशिया चषक भारताने जिंकला. श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर ईशान किशन म्हणाला, “जर संधी मिळाली तर मला सलामीला फलंदाजी करायला आवडेल. रोहितभाईची जर इच्छा असेल तर डावाची सुरुवात करू शकतो,” असे तो कर्णधाराला म्हणाला. तो पुढे म्हणाला, “आज फक्त ५० धावा करायच्या होत्या म्हणून मी सलामीला आलो. ५० धावा हव्या असल्यामुळे जास्त काही करता येण्यासारखे नव्हते. आम्ही खेळपट्टीवर जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न केला.”
सामन्याचा जर एकंदरीत विचार केला तर, नाणेफेक जिंकून श्रीलंकने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवला. हार्दिक पांड्या याने ३, मोहम्मद सिराज याने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह यालाही एक विकेट मिळाली. ५१ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी टी इंडिया फलंदाजीला आल्यानंतर लंकन गोलंदाजांना एकही विकेट घेता आली नाही.