India vs West Indies 1st ODI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत १-० असा विजय नोंदवल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाची नजर आता एकदिवसीय मालिकेवर आहे. माहितीसाठी की, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना गुरुवारी म्हणजेच २७ जुलै रोजी खेळवला जाईल. किंग्स्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना खेळला जाणार आहे. आगामी विश्वचषक २०२३च्या दृष्टीकोनातून ही मालिका संघ बांधणीसाठी महत्वाची ठरणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या सामन्यात दोन्ही संघांचे प्लेइंग ११ कसे असतील.
उल्लेखनीय गोष्ट अशी आहे की, नुकतीच भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली असून, भारताने ती १-०ने जिंकली आहे. दुसरीकडे, या मालिकेतील दुसरा सामना संततधार पावसामुळे अनिर्णीत झाला, त्या सामन्यातही भारताने उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. आता कसोटी मालिकेनंतर एकदिवसीय मालिका जिंकण्यावर टीम इंडियाचे लक्ष्य असणार आहे.
रोहित शर्माने या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी संघाच्या कॉम्बिनेशनबाबत मोठे भाष्य केले आहे. त्याच्यामते किमान ११-१२ सामन्यानंतर विश्वचषक २०२३ साठी कुठले योग्य खेळाडू आहेत याची निश्चित माहिती देता येईल. त्यासाठी ही मालिका खूप महत्वाची आहे. पहिल्या सामन्याच्या आधी, भारताचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकारांशी संवाद साधला जिथे त्याने मेगा टूर्नामेंटपूर्वी आपली मते आणि टीम इंडियाच्या योजना शेअर केल्या. रोहित म्हणाले की, “युवा खेळाडू आणि संघातील इतर खेळाडूंना खेळासाठी आवश्यक वेळ मिळण्यासाठी ही मालिका चांगली संधी असेल.
टीम इंडियाचा कर्णधार पुढे म्हणाला की, “वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका महत्त्वाची आहे कारण तेथे अनेक नवीन खेळाडू आहेत जे अननुभवी आहेत आणि आम्ही त्यांना खेळण्याची संधी देत आहोत. त्यांना काही भूमिका आम्ही देणार आहोत. हे खेळाडू ती जबाबदारी कशी पेलतात? आणि प्रतिसाद कसा देतात हे पाहण्यासाठी मी ही उत्सुक आहे. यातूनच अनेक पर्याय आम्हाला मिळतील.”
या सामन्यांनंतर विश्वचषकासाठी अंतिम संघ निश्चित केला जाईल. संघ निवडण्यासाठी कर्णधार, प्रशिक्षक आणि बीसीसीआय निवड समिती यांच्यात चर्चा केली जाईल. यावर रोहित म्हणाला की, “येथे आमच्याकडे ३ सामने आहेत आणि आम्ही पाहू की कोणाला संधी मिळते आणि त्यानंतर आम्ही १०-१२ एकदिवसीय सामन्यांनंतर निर्णय घेऊ.”
सूर्यकुमार यादव की संजू सॅमसन?
रोहित शर्मासाठी ही मालिका आशिया चषक आणि विश्वचषकापूर्वी टीम कॉम्बिनेशन करण्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. या मालिकेत सर्वांच्या नजरा सूर्यकुमार यादव, इशान किशन, संजू सॅमसन आणि युजवेंद्र चहल या खेळाडूंवर असतील. सूर्यकुमार यादवला या फॉरमॅटमध्ये कामगिरी सुधारण्याची गरज आहे. श्रेयस अय्यरच्या जागी सूर्याला चौथ्या क्रमांकावर संधी मिळू शकते. मात्र, त्याच वेळी संजू सॅमसनचा देखील त्या जागेसाठी विचार केला जाऊ शकतो.
दुसरीकडे, के.एल. राहुलच्या अनुपस्थितीत, इशान किशन आणि संजू सॅमसन विकेटकीपिंगसाठी दावा करत आहेत. या दोन्ही खेळाडूंना विश्वचषकापूर्वी दुसरे यष्टिरक्षक म्हणून आपले स्थान मजबूत करण्याची संधी आहे. राहुल सध्या रिहॅबवर असून ऋषभ पंत तोपर्यंत तंदुरुस्त दिसत नसल्याने विश्वचषकात तो खेळण्याची शक्यता कमी आहे.
संजू सॅमसन हा बहुतेक वेळा संघातून आत- बाहेर येत जात असतो असतो. अशा स्थितीत त्याला या मालिकेत आणखी संधी मिळण्याची अपेक्षा आहे. संजू सॅमसनने ११ एकदिवसीय सामन्यांमध्ये ६६च्या सरासरीने धावा केल्या आहेत. मात्र, पहिल्या वन डेत इशान किशनला त्याच्या अलीकडच्या कसोटी कामगिरीमुळे संघात संधी मिळू शकते. अशा स्थितीत मधल्या फळीत सूर्यकुमार यादव किंवा संजू सॅमसन यांच्यात चुरस असेल.
वेस्ट इंडिज एकदिवसीय संघ
शाई होप (कर्णधार), रोव्हमन पॉवेल (यष्टीरक्षक), अलिक अथानाज, यानिक कॅरिया, केसी कार्टी, डॉमिनिक ड्रेक्स, शिमरॉन हेटमायर, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, गुडाकेश मोती, जेडेन सील्स, रोमॅरियो शेफर्ड, केविन सिंक्लेअर, ओशान थॉम .
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.