Suryakumar Yadav wears Sanju Samson’s jersey: भारत आणि वेस्ट इंडिज संघांतील पहिला वनडे सामना केन्सिंग्टन ओव्हल येथे खेळला जात आहे. संजू सॅमसनला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही, पण मैदानावरील त्याची उपस्थिती वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळाली. खरे तर या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आले तेव्हा टीम इंडियाचा फलंदाज सूर्यकुमार यादवने संजू सॅमसनची जर्सी परिधान केली होती, म्हणजेच तो संजूची जर्सी परिधान करून मैदानात उतरला होता.
सूर्यकुमार यादवने परिधान केलेल्या जर्सीवर सॅमसन लिहिलेले होते आणि त्याच्या जर्सीवर ९ क्रमांकही कोरला होता. पहिल्या वनडेसाठी संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नाही. सूर्यकुमार यादवचा संघात समावेश करण्यात आला आहे. सूर्यकुमार जर्सी घालून मैदानात आला, तेव्हा चाहत्यांनीही प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका चाहत्याने लिहिले की, ‘सूर्यकुमारला हे देखील माहित आहे की तो संजू सॅमसनच्या जागी वनडे संघात घेण्यास योग्य नाही. त्याला या सामन्यात खेळण्यास भाग पाडले गेले. अज्ञात शक्तींविरुद्ध सूर्यकुमारची शानदार शैली.’
सामन्याबद्दल बोलायचे, तर वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ११ षटकानंतर ३ बाद ५४ धावा केल्या आहेत. सध्या खेळपट्टीवर शिमरॉन हेटमायर (१) आणि कर्णधार शाई होप (८) धावांवर खेळत आहेत. सात धावांच्या स्कोअरवर वेस्ट इंडिजची पहिली विकेट पडली. हार्दिक पांड्याने काइल मेयर्सला रोहित शर्माकरवी झेलबाद केले. मेयर्सने नऊ चेंडूत दोन धावा केल्या. त्यानंतर ४५ धावांवर वेस्ट इंडिजची दुसरी विकेट पडली. अलिक अथंजे १८ चेंडूत २२ धावा करून बाद झाला.
मुकेश कुमारने त्याला रवींद्र जडेजाच्या हाती झेलबाद केले. मुकेशची वनडेतील ही पहिली विकेट ठरली.त्यानंतर लगेच ४५ धावांच्या स्कोअरवर वेस्ट इंडिजची तिसरी विकेट पडली. शार्दुल ठाकूरने ब्रेंडन किंगला क्लीन बोल्ड केले. त्याने २३ चेंडूत १७ धावा केल्या. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना थोडी मदत करत आहे आणि भारतीय वेगवान गोलंदाज त्याचा पुरेपूर फायदा घेत आहेत. शिमरॉन हेटमायर आता शाई होपसह क्रीजवर आहे.