Shardul Thakur, IND vs WI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना टीम इंडियाने पाच विकेट्सने जिंकला. यासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. कसोटी मालिका १-० ने जिंकल्यानंतर भारतीय संघ एकदिवसीय मालिकाही जिंकण्यापासून एक पाऊल दूर आहे. दुसरीकडे, वेस्ट इंडिजसाठी संघ आणि स्वरूप बदलत असले तरी निकाल तोच आहे. विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर या संघाने भारताविरुद्ध नव्या दमाने खेळण्यासाठी मैदानात उतरले, मात्र हा संघ २३ षटकांत ११४ धावांवर गारद झाला. भारताने २२.५ षटकात पाच विकेट्सच्या मोबदल्यात ११८ धावांचे लक्ष्य गाठत दणदणीत विजय मिळवला.
पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान शार्दुल ठाकूरच्या विकेटवरून वाद झाला. तो बाद आहे की नाबाद यावरून त्याच्यात आणि अंपायरमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अष्टपैलू शार्दुल ठाकूर पहिल्या वन डे सामन्यात फारशी चमकदार कामगिरी करू शकला नाही. त्याला कर्णधार रोहित शर्माच्या आधी फलंदाजीला पाठवण्यात आले होते. मात्र तरी देखील त्याला धावा करताना अपयश आले. अंपायरने बाद दिल्यानंतर तो निराश झाला आणि मैदानावरच लाइव्ह सामन्यादरम्यान त्याने वाद घालण्यास सुरुवात केली.
शार्दुल ठाकूर आऊट होता की नॉट आऊट?
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू लॉर्ड शार्दुल ठाकूर वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात बाद झाल्यानंतर निराश झाला आणि मैदानावरील अंपायर्सशी वाद घातला. शार्दुल पहिल्या एकदिवसीय सामन्यात ६व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. लेगस्पिनर यानिक कारियाने त्याला अवघ्या एका धावेवर बाद केले. १८व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर, कारियाने ऑफ-स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला आणि शार्दुलच्या बॅटला लागून तो दुसऱ्या स्लीपवर अॅलिक अथानेझकडे गेला आणि त्याने शानदार झेल पकडला. बाद झाल्यानंतर शार्दुल ठाकूर तात्काळ अंपायरकडे गेला आणि त्याने बाद झाल्याबद्दल निराशा व्यक्त केली.
वेस्ट इंडीजच्या गोलंदाज यानिक कारियाने चेंडू टाकण्याआधी तो काही गडबडीमुळे खेळण्यास तयार नसल्याचे सांगत होता. त्याने साइटस्क्रीनकडे इशारा करत तिथे काहीतरी घडत आहे त्यामुळे माझी एकाग्रता भंग झाली होती, असेही त्याने सांगितले. पण अंपायर निगेल डुगुइड आणि मायकेल गॉफ यांनी त्याला मैदान सोडण्यास भाग पाडले. हा संपूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
११५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने फलंदाजी क्रमवारीतमध्ये बरेच प्रयोग केले. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली फलंदाजीला येण्याच्या मूडमध्ये नव्हते. इशान आणि गिलने डावाची सुरुवात केली. सूर्यकुमार तिसऱ्या क्रमांकावर आला. हार्दिक चौथ्या क्रमांकावर तर जडेजा पाचव्या क्रमांकावर आहे. शार्दुलने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली. मात्र, भारताच्या पाच गडी बाद झाल्याने कर्णधार रोहित (१२) आणि रवींद्र जडेजाला (१६) फलंदाजीला उतरून सामना संपवावा लागला. वेस्ट इंडिजकडून गुडाकेश मोतीने दोन, जेडेन सेल्स आणि यानिकने प्रत्येकी एक गडी बाद केला.