अनुभवी सलामीवीर रोहित शर्माच्या कर्णधारपदाची सुरुवात विजयाने झाली. त्याच्या नेतृत्वाखाली, भारतीय संघाने अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा ६ गडी राखून पराभव केला. या सामन्यात रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, डीआरएसचा चांगला उपयोग केला, विंडीजचा डाव १७६ धावांवर आटोपल्यानंतर सलामी दिली आणि अर्धशतक झळकावले. डीआरएसच्या निर्णयावर, महान भारतीय फलंदाज सुनील गावसकर यांनी रोहितचे कौतुक केले आहे. त्यांनी डीआरएसचे नवीन नावही सुचवले आहे.
या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या नात्याचे सुंदर दृश्य पाहायला मिळाले. दोघांची भागीदारी मोठी झाली नसली तरी मैदानावरील त्यांची केमिस्ट्री अप्रतिम होती. जेव्हा विराटने रोहित शर्माला डीआरएससाठी, राजी केले तेव्हा कर्णधारानेही त्याच्याकडे दुर्लक्ष केले नाही. भारताच्या महान फलंदाजांपैकी एक असलेल्या गावसकर यांनी या सामन्याच्या कॉमेंट्रीदरम्यान एक प्रतिक्रिया दिली.
७२ वर्षीय गावसकरांनी डीआरएसचे नाव बदलण्याबाबत सांगितले, ते म्हणाले ”पूर्वी जेव्हा महेंद्रसिंह धोनी योग्य रिव्ह्यू घ्यायचा तेव्हा त्याला ‘धोनी रिव्ह्यू सिस्टम’ म्हटले जायचे. आता रोहित शर्मा ही कामगिरी करतोय, म्हणून मला वाटते याला आता ‘डेफिनेटली रोहित सिस्टीम’ म्हटले पाहिजे.
हेही वाचा – IND vs WI 1st ODI : रोहित-विराटमध्ये खरंच आहे वाद? हा VIDEO तुमचे डोळे उघडेल!
रोहित शर्माने मालिकेतील या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ६० धावांची शानदार खेळी केली आणि इशान किशनसोबत ८४ धावांची सलामी भागीदारीही केली. या विजयासह टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतही १-०अशी आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजला केवळ ४३.५ षटकेच फलंदाजी करता आली आणि १७६ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात भारताने २८ षटकांत ४ गडी गमावून लक्ष्य गाठले. एकदिवसीय कर्णधार म्हणून रोहितचा हा ११वा सामना होता. त्याने आतापर्यंत ९ सामने जिंकले आहेत. मालिकेतील दुसरा सामना ९ फेब्रुवारीला होणार आहे.