IND vs WI 1st T20 Result : भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान पाच सामन्यांची टी २० मालिका आजपासून (२९ जुलै) सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना तारौबा येथील ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला गेला. या सामन्यात भारताने यजमानांचा ६८ धावांच्या फरकाने पराभव केला. त्यामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत भारताला १-० अशी आघाडी मिळाली आहे. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्या समोर विंडीजचे फलंदाज तग धरू शकले नाहीत.

प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित २० षटकांमध्ये सहा गड्यांच्या बदल्यात १९० धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या विंडीजच्या सलामीवीरांनी पहिल्या दोन षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी सुरू केली होती. मात्र, तिसऱ्या षटकामध्ये अर्शदीप सिंगने कायले मेयर्सला बाद करून यजमानांना पहिला धक्का दिला. त्यानंतर ठराविक अंतराने विंडीचे गडी बाद होत गेले. शामराह ब्रूक्सने केलेल्या २० धावा, ही वेस्ट इंडीजच्या डावातील सर्वोच्च धावसंख्या ठरली. भारताच्यावतीने अर्शदीप सिंग, रवि बिश्नोई आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी दोन-दोन गडी बाद केले. तर, भुवनेश्वर कुमार आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी एक गडी बाद केला.

या सामन्यात वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारताला प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागले. प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित २० षटकांमध्ये सहा गड्यांच्या बदल्यात १९० धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी डावाची सुरुवात केली होती. सूर्यकुमार २४ धावा करून बाद झाला. त्यानंतर, आलेले श्रेयस अय्यर (०), ऋषभ पंत (१४), हार्दिक पंड्या (१), रविंद्र जडेजा (१६) विशेष कामगिरी करू शकले नाही.

हेही वाचा – CWG 2022 IND vs PAK Badminton: भारतीय बॅडमिंटन टीमने उडवला पाकिस्तानचा धुव्वा; एकीचे बळ दाखवत केला पराभव

या दरम्यान कर्णधार रोहित शर्माने ४४ चेंडूंत ६४ धावांची अर्धशतकीय खेळी केली. अशी कामगिरी करून तो पुन्हा टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलला मागे टाकले आहे. रोहित बाद झाल्यानंतर दिनेश कार्तिकने भारताचा डाव सावरला. त्याने केवळ १९ चेंडूंमध्ये ४१ धावा फटकावल्या.

नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय मालिकेत भारताने यजमान संघाचा ३-० असा पराभव केला आहे. त्यानंतर टी २० मालिकेतही भारताची विजयाने सुरुवात झाली आहे. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. १९ चेंडूंमध्ये ४१ धावा फटकावणाऱ्या दिनेश कार्तिकला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

Story img Loader