टीम इंडियाने पहिल्या कसोटी सामन्यात यजमान विंडीजला तब्बल ३१८ धावांनी पराभूत केले आणि मोठा विजय संपादन केला. ४१७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा दुसरा डाव केवळ १०० धावांमध्ये आटोपला. जसप्रीत बुमराहने ५ आणि इशांत शर्माने ३ बळी घेत भारताला विजय मिळवून दिला. दमदार फलंदाजी करणाऱ्या अजिंक्य रहाणेला सामनावीर घोषित करण्यात आले.
भारताच्या दुसऱ्या डावात रहाणेचे शतक (१०२) आणि हनुमा विहिरीच्या ९३ धावा या खेळीच्या जोरावर भारताने विंडीजला विजयासाठी ४१७ धावांचे अंतिम लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजच्या फलंदाजांची पुरती दैना उडाली. जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा यांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे विंडीजचे फलंदाज हतबल झाले. त्यामुळे यजमान विंडीजच्या डावाची अवस्था ९ बाद ५० अशी झाली होती. शेवटच्या गड्यासाठी केमार रोच आणि कमिन्स यांनी ५० धावांची भागीदारी केली आणि विंडीजला १०० चा आकडा गाठून दिला. पण अखेर इशांत शर्माने केमार रोचला माघारी पाठवत भारताला दणदणीत विजय मिळवून दिला. विंडीजकडून केवळ तीन खेळाडूंना दोन आकडी धावसंख्या गाठता आली. त्यातही ८ व्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या केमार रोचने सर्वाधिक ३८ धावा केल्या. भारतातर्फे बुमराहने ५, इशांतने ३ तर शमीने २ गडी टिपले.
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत संधी न मिळालेल्या अजिंक्य रहाणेने कसोटी संघातील मिळालेल्या संधीचे सोने केले. सराव सामन्यात त्याने अर्धशतक झळकवून आपली चमक दाखवून दिली होती. तीच लय कायम राखत त्याने पहिल्या डावात ८१ धावांची दमदार खेळी करून दाखवली, पण त्याचे शतक मात्र हुकले. ही कसर त्याने दुसऱ्या डावात भरून काढली. विंडीजच्या गोलंदाजांचा समाचार घेत त्याने दुसऱ्या डावात १०२ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर आणि त्याला हनुमा विहारीने (९३) दिलेल्या उत्तम साथीच्या जोरावर भारताला विंडीजला मोठे आव्हान देणे शक्य झाले. दोन डावात मिळून १८३ धावा ठोकणाऱ्या मुंबईकर अजिंक्य रहाणेला सामनावीर घोषित करण्यात आले.