Windsor Park Pitch Report, IND WI 1st Test: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेची सुरुवात १२ जुलै २०२३ पासून डॉमिनिका येथील विंडसर पार्क येथे होणार्‍या सामन्याने होईल. भारतीय वेळेनुसार हा सामना सायंकाळी साडेसात वाजता सुरू होईल. या मैदानावर आतापर्यंत ५ कसोटी सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी ४ निकाल लागले आहेत आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे. या मैदानावर भारताने आतापर्यंत २०११ मध्ये एक कसोटी सामना खेळला होता आणि तो सामना अनिर्णित राहिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या मैदानावर वेस्ट इंडिजने ५ पैकी फक्त एकच कसोटी सामना जिंकला आहे, त्यात ३ मध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. या मैदानावर वेस्ट इंडिजचा एकमेव विजय मार्च २०१३मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध झाला होता आणि ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरुद्ध त्यांना पराभव पत्करावा लागला होता. यजमान वेस्ट इंडिजसाठी विश्वचषक पात्रता फेरीतील पराभवाच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. भारतासारख्या बलाढ्य संघाला हरवून जागतिक क्रिकेटमध्ये आपले अस्तित्व टिकवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

विंडसर पार्क खेळपट्टी अहवाल

साधारणपणे विंडसर पार्कची खेळपट्टी पारंपारिक कसोटीला पोषक मानली जाते. पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांना मदत मिळते आणि पुढील दोन दिवस फलंदाजांना मदत मिळते. त्यानंतर खेळपट्टी संथ होत जाते आणि वेगही कमी होतो. या ठिकाणी सरासरी धावसंख्या ही कमी दिसून आली आहे. साधारणतः दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघाने अधिक धावा केल्या. पाठलाग करणाऱ्या संघांनी लहान लक्ष्यांचा अधिक पाठलाग केला आहे. त्यामुळे हा इतिहास पाहता जो संघ नाणेफेक जिंकेल तो प्रथम गोलंदाजी घेईल.

हेही वाचा: IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत यशस्वी जैस्वाल करणार टीम इंडियात पदार्पण, रोहितची घोषणा; जाणून घ्या प्लेईंग ११

हवामानाचा अंदाज

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. पण या सामन्यावर पावसाचे सावट असल्याचे आता समोर आले आहे. या कसोटी सामन्यामध्ये जोरदार पाऊस पडू शकतो. कारण, रोहित आणि अजिंक्य रहाणेच्या व्हिडीओमध्ये अचानक पाऊस आला होता. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सामन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १२ जुलैला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतर सामन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पाऊस पडणार नाही आणि वातावरण कोरडे असेल. या दोन दिवसांमध्ये चांगला खेळ होऊ शकतो. सामन्याच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामन्याच्या अखेरच्या दोन दिवसांमध्ये खेळ होणार की नाही, याची शक्यता कमी असल्याचे म्हटले जात आहे.

सामना कधी सुरु होणार?

भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. या सामन्याचे पहिले सत्र रात्री ९.३० वाजता संपेल. त्यानंतर दुसरे सत्र १०.१० वाजता सुरू होईल, जे रात्री १२.१० पर्यंत चालेल. चहापानानंतरचे तिसरे आणि शेवटचे सत्र १२.३० वाजता सुरू होईल आणि पहाटे २.३० पर्यंत चालेल. सामन्याच्या या वेळेत जर पूर्ण ९० षटके खेळली नाही तर सामना आणखी काही काळ पुढे वाढू शकतो. मात्र, साधारणतः तीन वाजेपर्यंत दिवसाचा खेळ संपेल.

हेही वाचा: MS Dhoni: युवराज सिंगच्या वडिलांचा धोनीवर आरोप; म्हणाले, “कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने वर्ल्डकप जिंकावा…”

कसोटीत भारत आणि वेस्ट इंडिजचे हेड टू हेड रेकॉर्ड

कसोटी सामन्यांमध्ये, भारत आणि वेस्ट इंडिज आतापर्यंत ५२ वेळा एकमेकांविरुद्ध खेळले आहेत, त्यापैकी भारतीय क्रिकेट संघाने २२ सामने जिंकले असून वेस्ट इंडिजने ३० सामने जिंकले आहेत. या काळात भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात एकही सामना अनिर्णित राहिला नाही. आकडेवारी पाहिल्यानंतर हे सहज लक्षात येईल की आतापर्यंत वेस्ट इंडिजने भारतावर वर्चस्व गाजवले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs wi 1st test pitch report of the first test between india and west indies know how the weather will be avw